मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. गणेशोत्सव संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची रणनीती आखणं सुरू केले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाबाबत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांना निवडणुकीच्या मैदानात टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या रुपाने'महाशक्ती' पुढे येणार आहे.
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती, भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन आघाडीबाबत चर्चेला सुरूवात केली आहे. तिसऱ्या आघाडीसाठी आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीपूर्वी बच्चू कडू म्हणाले की, सत्तेचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे. सत्तेला अनेक पर्याय उभे राहिले पाहिजे. दावेदारी वाढली, पक्ष वाढले तर काम करणाऱ्यांना अधिक काम करावे लागते. कामाशिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच महायुती असो महाविकास आघाडी यांचे लक्ष्य सत्तेवर आहे मात्र आमचे लक्ष जनतेवर आहे. हक्काच्या लढाईसाठी आम्ही लढतोय. प्रत्येक घटकातील गरीबांसाठी ही लढाई आहे. राज्यातील राजकीय अवस्था विचित्र झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांसाठी पर्याय उभा केला पाहिजे. उद्या जर आमचे चांगले उमेदवार निवडून आले तर आम्ही सत्ता बनवू. राज्यातील रयतेसाठी आम्ही ही खेळी करतोय. जर ही खेळी यशस्वी झाली तर देशातील हे राज्य शेतकरी आणि मजुरांना न्याय देणारं राज्य ठरेल. ही आमची तिसरी आघाडी नव्हे तर महाशक्ती असेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, तिसऱ्या आघाडी या शब्दाला आमचा आक्षेप आहे. ते दोन पहिले आणि आम्ही तिसरे का? गेल्या ५ वर्षात महायुती आणि महाविकास आघाडी आलटून पालटून अडीच अडीच वर्ष सत्तेत होते. या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे. आम्ही व्यापक आणि आश्वासक आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. जनतेची ताकद उभी करून चांगले लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी आम्ही तयारी करतोय असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.