महायुतीचं जागावाटप ठरलं?; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

By प्रविण मरगळे | Published: September 6, 2024 09:12 AM2024-09-06T09:12:54+5:302024-09-06T09:14:28+5:30

विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप ठरली नसली तरी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. इच्छुकांच्या गाठीभेटी, मतदारांशी संपर्क अभियान याला सुरुवात झाली आहे.

Maharashtra Election 2024: Mahayuti seat sharing formula decided?; BJP, Ajit Pawar NCP and Eknath Shinde Shivsena how many seats will fight | महायुतीचं जागावाटप ठरलं?; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

महायुतीचं जागावाटप ठरलं?; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत बैठका सुरू झाल्या आहेत. महायुतीतएकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल. जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाईल. महायुतीत जागावाटपात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७५-८० जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ६०-६५ जागा  मिळण्याची शक्यता आहे तर भाजपा १३०-१३५ जागांवर आणि इतर छोट्या मित्रपक्षांना ३-५ जागा दिली जाईल. शिंदे-अजितदादा-फडणवीस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. विद्यमान आमदार ज्या पक्षांचे आहेत त्यांना तो मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे. यातही काही जागांची अदलाबदल करण्यात येऊ शकते. 

मागील निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, भाजपानं १६४ तर शिवसेनेनं १२४ जागा लढवल्या होत्या त्यात भाजपानं १०५ आणि शिवसेनेनं ५६ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं १२१ जागा लढवून त्यातील ५४ जागा जिंकल्या होत्या. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० हून अधिक आमदार महायुतीत सहभागी झाले तर अजित पवारांच्या नेतृत्वातही ४० आमदार सत्तेत आले. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटपात फेरबदल होतील. 

जागावाटपावर अजित पवार काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्रित बसून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. निवडून येण्याच्या क्षमतेवर भर देऊन जागावाटप होईल. मतदारसंघात कोणता पक्ष मजबूत आहे याचे निरीक्षण करून जागावाटपाचा निर्णय घेऊ. मागील निवडणुकीत आम्ही ५४ जागा जिंकलो, ६-७ अपक्ष आमच्यासोबत आहेत त्यामुळे ६० हून अधिक जागा आम्ही नक्कीच घेऊ असं अजित पवारांनी सांगितले आहे.

शिवसेनेचं 'मिशन ८०'

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ७० ते ८० विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघात लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानातून प्रत्येक लाभार्थी महिलेपर्यंत पोहचण्याचा कार्यक्रम पक्षाने हाती घेतला आहे. या मतदार संघात शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असे हमीपत्र घेऊन १० लाडक्या बहिणींच्या घरी पोहोचेल. दररोज किमान ५ लाख आणि महिनाभरात ६० लाख लाडक्या बहिणींची संपर्क साधण्याचा हेतू पक्षाचा आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला ९, शिवसेनेला ७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा जिंकता आली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा तिन्हीही पक्षाचा प्रयत्न आहे. त्यातून भाजपाकडून ज्येष्ठ नेत्यांचे विभागवार संवाद दौरे, राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा आणि शिवसेनेकडून कुटुंब भेट अभियानावर जोर दिला जात आहे. 

Web Title: Maharashtra Election 2024: Mahayuti seat sharing formula decided?; BJP, Ajit Pawar NCP and Eknath Shinde Shivsena how many seats will fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.