छत्रपती संभाजीनगर - आम्ही पाडण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहोत. मराठा, धनगर, मुस्लीम, बौद्ध, लिंगायत, मातंग, माळी समाजाला एकत्रित करून त्यांना आवाहन करतोय. महायुती, महाविकास आघाडी हे जे पक्षीय राजकारण आहे त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि खरे प्रतिनिधी विधानसभेत पाठवले पाहिजेत. ज्यादिवशी समाज आमचा मित्र होईल तेव्हा हा राजकीय खेळखंडोबा थांबेल. महाराष्ट्राचा खरा आवाज विधानसभेत पाठवायचा आहे. जर आम्हाला अपेक्षित निकाल आला तर मनोज जरांगे पाटील हे आमचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असं विधान भारतीय बौद्ध महासभा संघटनेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले आहे.
मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राजरत्न आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील स्वत:चे प्राण पणाला लावून लढतायेत. राज्यात जातीय सलोखा राहावा यासाठी आम्ही राज्यात दौरा करत आहोत. आता मराठवाड्यात आहे त्यानंतर विदर्भ दौऱ्यावर जावू. जरांगे लढतायेत तसं आम्हीही लढतोय. अनुसूचित जातीच्या २९ जागा त्यातल्या १५ जागा भाजपाने चोरल्यात. जी भाजपा आरक्षण आणि संविधान विरोधात बोलते, त्यांना आरक्षित जागांवर त्यांचा माणूस उभा करण्याचा नैतिक अधिकार आहे का? आमचा खरा प्रतिनिधी विधानसभेत पाठवायचा आहे जो समाजासाठी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडेल असा उमेदवार आम्ही पाठवणार आहोत. आमच्या बैठका ज्यांच्यासोबत आहेत त्यांचे कुठलेही पक्ष नाहीत. आम्ही राजकीय पक्षात उतरलो नाही. परंतु येणाऱ्या विधानसभेत आम्ही सगळे एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जावू असं चित्र आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच दसरा मेळाव्याला मनोज जरांगे पाटील हे घोषणा करणार आहेत. नक्कीच आमची आशा आहे तेव्हा नवीन महाराष्ट्र यामाध्यमातून बघायला मिळेल. आमची ज्यापद्धतीने बोलणी सुरू आहेत. १२ तारखेला नक्की काय घोषणा होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल. मराठा, धनगर, बौद्ध, माळी, मातंग सर्व समाजातील लोक आमच्यासोबत असतील. जर विधानसभेत आमचे प्रतिनिधी गेले तर ते मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडतील. नवीन शैक्षणिक धोरणाला आमचा विरोध राहणार आहे. ज्याप्रकारे मंत्र्यांची मुले शिक्षण घेतायेत ते आमच्याही मुलांना मिळालं पाहिजे एकच शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात असलं पाहिजे. शेतीविषयक धोरण जे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे ते लागू केले पाहिजे असं राजरत्न आंबेडकरांनी म्हटलं.
दरम्यान, महायुती, मविआ यांच्याकडे राजकीय नैतिकता राहिलेली नाही. भाजपा-उद्धव ठाकरे एकत्र येत उद्या सरकार जरी स्थापन केले तरी महाराष्ट्राच्या जनतेला धक्का बसेल अशी परिस्थिती नाही. एका रात्रीत हे कधीही एकत्र होतील हे जनतेला वाटते. त्यामुळे हे जे नाटक या लोकांचे सुरू आहे ते बंद झाले पाहिजे. पक्षातील नेत्यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले पाहिजेत. बौद्ध, मराठा, मुस्लीम कुणीही भाजपाला मतदान करणार नाही. किरण रिजिजू यांना महाराष्ट्रात फिरवण्याचा ते प्रयत्न करतील. आमच्या आंबेडकर कुटुंबातील १-२ सदस्य त्यांच्या गळाला लावण्याचा प्रयत्न ते करत होते परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरणार नाही. एकही आंबेडकरी बौद्ध भाजपाच्या दिशेने वळणार नाही. बौद्ध भाजपाच्या प्रचाराला कधीही बळी पडणार नाही असा विश्वास राजरत्न आंबेडकरांनी व्यक्त केला.
जरांगे पाटलांविरोधातील आंदोलन 'सागर' बंगल्यावर नियंत्रित
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आणखी एक आंदोलन सागर बंगल्याच्या इशाऱ्यावरून सुरू असते. आंदोलनकर्त्यांचे चरित्र्य काय हे टीव्हीवर पाहिले. मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडण लावण्याचं काम सुरू आहे. आज दोन्ही समाज जागरुक झाला आहे. महाराष्ट्रात कुठेही दंगली होत नाहीत. सागर बंगल्यावरून ही आंदोलने नियंत्रित केली जातायेत असा आरोप करत राजरत्न आंबेडकरांनी आमचं तिसऱ्या आघाडीचं माहिती नाही, परंतु आज ज्यापद्धतीने आम्ही निकाल दिला तर आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील असा दावा केला.