पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. त्यात महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी काही उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आज मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहिम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत तर वरळीत आदित्य ठाकरेंच्याविरोधात संदीप देशपांडे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे.
विशेष म्हणजे या यादीत मनसेनं खडकवासला मतदारसंघात दिवंगत मनसे आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना तिकीट दिली आहे. त्यामुळे खडकवासला मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं १३ आमदार निवडून आणले होते. त्यातील खडकवासला मतदारसंघात रमेश वांजळे हे विजयी झाले होते. वांजळेच्या रुपाने मनसेला खडकवासला मतदारसंघात आमदार मिळाला होता. त्यानंतर वांजळे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती.
खडकवासला पोटनिवडणुकीत मनसेनं उमेदवार उतरवला नाही. मात्र त्याठिकाणी राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या वांजळे यांच्या पत्नीचा पराभव झाला आणि तिथून भाजपाचा उमेदवार निवडून आला. खडकवासला मतदारसंघात मागील २ टर्म भाजपाचा आमदार निवडून येत आहे. या मतदारसंघात मनसेला मानणाराही मोठा वर्ग आहे. खडकवासला मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत. याठिकाणी महायुती आणि मविआकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने वांजळे कुटुंब पुन्हा एकदा मनसेत आलं आहे.
मनसेचे गोल्डनमॅन म्हणून रमेश वांजळे प्रसिद्ध
मयुरेश वांजळे यांचे वडील रमेश वांजळे हे मनसेचे गोल्डनमॅन म्हणून नावारुपास आले. २००९ मध्ये रमेश वांजळे यांनी मनसेच्या तिकिटावर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. मनसेचे आमदार असताना रमेश वांजळे यांनी मनसे स्टाईलनं अनेक आंदोलने गाजवली. २०११ साली रमेश वांजळे यांचे निधन झालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा त्यांच्या भाषणातून रमेश वांजळे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज ठाकरे एकदा भाषणात रमेश वांजळे यांच्याविषयी बोलताना भावूकही झाल्याचं लोकांनी पाहिले होते. आता २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा वांजळे कुटुंब मनसेशी जोडले गेले आहे.