'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:52 PM2024-10-16T16:52:31+5:302024-10-17T12:47:01+5:30
राष्ट्रवादी शरद पवारांकडील मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार गेल्या ३ वर्षापासून करतायेत निवडणूक लढण्याची तयारी
नागपूर - विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आता सर्वांचे लक्ष जागावाटपावर लागलं आहे. अद्याप महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यात जागावाटप जाहीर झाले नाही. त्यात अनेक इच्छुक उमेदवार त्यांना उमेदवारी मिळेल या आशेने यादीची प्रतिक्षा करत आहेत. लोकसभेला ज्यारितीने सांगली पॅटर्न चर्चेत आला. महाविकास आघाडीत सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या मशालीला गेली तिथे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांचे नातू विशाल पाटील बंडखोरी करत अपक्ष उभे राहिले. विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा सांगलीत लाजिरवाणा पराभव झाला. अपक्ष म्हणून निवडणुकीत विजयी झालेले विशाल पाटील यांनी निकालानंतर काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. आता विधानसभेला विदर्भात सांगली पॅटर्न पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
विदर्भातील काटोल मतदारसंघात सध्या ही परिस्थिती बनली आहे. याठिकाणी काँग्रेसचे माजी मंत्री श्रीकांत जिचकर यांचे चिरंजीव याज्ञवल्क्य जिचकर महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. परंतु सध्या या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आमदार आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ काटोल यंदा काँग्रेसला सुटेल या आशेने याज्ञवल्क्य जिचकर मतदारसंघात गेल्या ३-४ वर्षापासून तयारी करत आहेत. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे या मतदारसंघात अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख निवडणूक लढवणार असं बोलले जाते तर अनिल देशमुख हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांविरोधात उभे राहतील अशी चर्चा आहे. मागील काही काळापासून अनिल देशमुख सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे देशमुख फडणवीस अशी लढत विधानसभेला दिसेल असे संकेत मिळत आहेत.
मात्र काँग्रेस नेते याज्ञवल्क्य जिचकर गेल्या ३-४ वर्षापासून काटोलमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. मतदारसंघात केलेली शैक्षणिक आणि सामाजिक कामे याचा निवडणुकीत फायदा होईल असा त्यांचा विश्वास आहे. श्रीकांत जिचकर यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचं काम याज्ञवल्क्य जिचकर करत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांकडून याज्ञवल्क्य जिचकरांना काटोलची जागा काँग्रेसला मिळेल असं आश्वासन दिले जात आहे. मात्र अद्याप ही जागा कोण लढवणार हे निश्चित नाही. मात्र जर ही जागा काँग्रेसला सुटली नाही तर याठिकाणी याज्ञवल्क्य जिचकर अपक्ष निवडणुकीत उभे राहण्याचा विचार करू शकतात. वडिलांनी या मतदारसंघात केलेले काम आणि माझ्या कामाचा फायदा निवडणुकीत होण्याची खात्री त्यांना वाटते.
कोण आहेत याज्ञवल्क्य जिचकर?
वयाच्या २६ व्या वर्षी आमदारकी मिळवणारे काँग्रेस नेते डॉ. श्रीकांत जिचकर यांचे याज्ञवल्क्य हे सुपुत्र आहेत. ते युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम करतात. २००८ पासून याज्ञवल्क्य डॉ. श्रीकांत जिचकर फाऊंडेशनमार्फत सामाजिक कामे करतात. श्रीकांत जिचकर हे १९८०-८५ या काळात काटोल मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या ३-४ वर्षापासून याज्ञवल्क्य मतदारसंघात लढण्याची तयारी करत आहेत.
दरम्यान, १९९५ च्या निवडणुकीत अनिल देशमुख हे स्वत: अपक्ष म्हणून काटोल विधानसभा मतदारसंघात निवडून आले होते. त्यानंतर १९९९ साली राष्ट्रवादीतून ते या मतदारसंघात विजयी झाले. १९९९, २००४, २००९ आणि २०१९ अशी ४ टर्म अनिल देशमुखांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ साली या मतदारसंघातून आशिष देशमुख भाजपातून निवडून आले होते. काँग्रेसमध्ये गेलेले आशिष देशमुख आता पुन्हा भाजपात परतले आहेत. परंतु ते नागपूरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यात या मतदारसंघात याज्ञवल्क्य जिचकर यांना उमेदवारी न मिळाल्यास सांगली पॅटर्न काटोलमध्ये दिसणार का आणि दिसलाच तर त्याचा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.