Maharashtra Election 2024: औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या एमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनी नितेश राणे यांना मारण्याची धमकी दिली. त्यांच्या या विधानावर बोलताना नारायण राणे यांनी तुमचे पाय कलम करू असा इशारा दिला.
एआयएमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनी प्रचार सभेत बोलताना नितेश राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. "एक पाच रुपयांचा पेप्सी म्हणतो की, मशिदीत घुसून मारू. त्यांची इतकी हिमंत वाढली आहे. त्यांना विधानसभेत घुसून मारण्याची हिमंत आमच्यात आहे", असे विधान सिद्दिकींनी केले.
नारायण राणे म्हणाले, पाय कलम करू
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी नासिर सिद्दिकी यांना पाय कलम केले जातील असा इशारा दिला.
नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ते म्हणाले, "एमआयएमचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनी आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी जाहीर भाषणातून दिली. हा तोच पक्ष आहे, ज्याच्या प्रमुखांनी एक एक मुसलमान वीस हिंदुंना भारी पडेल अशी दर्पोक्ति केली होती."
"निजामशाहीच्या या पाठिराख्यांनी लक्षात ठेवावे, देशात आता लांगुलचालन करणाऱ्यांचे सरकार नसून, बहुसंख्यांचे हितरक्षक करणारे सरकार आहे. नितेश राणे व हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील", असा इशारा राणेंनी एमआयएमचे उमेदवार सिद्दिकी यांना दिला.
औरंगाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना आहे. या मतदारसंघात एमआयएमचा प्रभावही आहे. इम्तियाज जलील याच मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते. आता प्रदीप जैस्वाल (शिवसेना शिंदे), बाळासाहेब थोरात (शिवसेना ठाकरे) आणि एमआयएमचे नासिर सिद्दिकी आणि जयवंत ओक उर्फ बंड (बंडखोर, शिवसेना) अशी लढत होत आहे.