MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 09:32 AM2024-10-04T09:32:49+5:302024-10-04T09:35:51+5:30
ज्या मतदारसंघात मुस्लीम समुदाय जास्त आहे, दलित समाज अधिक आहे त्या मतदारसंघाची यादी वेगळी केली आहे असं इम्तियाज जलील यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर - आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील काही दिवसांत होऊ शकते. त्यात महायुतीसमोर महाविकास आघाडीचं तगडं आव्हान उभं राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मविआनं विधानसभेची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. अशावेळी असदुद्दीन औवेसी यांच्या MIM पक्षाकडून महाविकास आघाडीला सोबत घेण्यासाठी लेखी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मविआकडे हा प्रस्ताव दिला असून येत्या निवडणुकीत सोबत येण्याचं आवाहन केले आहे.
माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, महाविकास आघाडीचे जे २ मुख्य घटक आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या प्रमुखांना मी पत्र पाठवलं आहे. मविआसोबत आघाडी झाली तर महायुतीला महाराष्ट्रात मोठा धक्का देऊ शकतो. त्यांच्या काही नेत्यांकडून आमच्याकडे लिखितमध्ये काही प्रस्ताव आला नाही असं म्हटलं होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी औवेसी यांच्याशी चर्चा करून एमआयएमचा राज्याचा प्रमुख म्हणून मी पत्र पाठवले होते. आम्ही लेखी प्रस्ताव दिला आहे. उद्धव ठाकरे नवीन पुरोगामी आहेत, त्यांना MIM सोबत हवी का याबाबत त्यांची भूमिका माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला नवीन पुरोगामी चालतात, मग आमच्याबाबत काय आक्षेप आहेत असे प्रश्नही लेखी पत्रात उपस्थित केल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही अद्याप जागेची यादी दिली नाही. मविआ आम्हाला सोबत घ्यायला तयार आहे का याबाबत स्पष्ट होऊ द्या. त्यानंतर आम्ही आमची यादी घेऊन चर्चेला येऊ. आघाडी असते तेव्हा ताकदेनुसार जागा मागितली जाते. आघाडीत सर्व पक्षांचा विचार करावा लागतो. एकदा मविआकडून होकार आला तर त्यावर बसून चर्चा करू. जर मविआने नकार दिला तर आम्ही तयार आहोत. ज्या मतदारसंघात मुस्लीम समुदाय जास्त आहे, दलित समाज अधिक आहे त्या मतदारसंघाची यादी वेगळी केली आहे. ज्या जागा आम्ही मागील वेळी जिंकल्यात भिवंडी, मालेगाव, धुळे, भायखळा, वर्सोवा या जागेवर आमची ताकद आहे. जागेवर आम्ही तडजोड करायला तयार आहे. मुस्लीम बहुल २८ मतदारसंघ आहे. जिथे मुस्लिमांना उमेदवारी दिली तर ते निवडून येतील असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
दरम्यान, मुस्लीम समाजाला ज्याप्रकारे भाजपा टार्गेट करत आहे. त्यांचे नेतृत्व गप्प बसत आहे. मुस्लीम धर्मगुरुबद्दल बोलणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री पाठीशी घालतात तर यांना धडा शिकवणं आमची जबाबदारी झाली आहे. मी २ दिवस मुंबईत होतो, इम्तियाज जलील कुणाला भेटले याची माहिती घ्या. मोठमोठ्या नेत्यांसोबत माझी बैठक झाली आहे. लेखी प्रस्ताव देऊन कमीत कमी १५ दिवस झालेत. महाविकास आघाडीकडून सकारात्मक निघत आहे. गेले २ दिवस जी बैठक झाली तीदेखील सकारात्मक आहे. तोडगा निघेल असं सूचक विधान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले.