Hingna Vidhan Sabha 2024 Raj Thackeray: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठा निर्णय घेतला आहे. मनसेकडूनहिंगणा विधानसभा मतदारसंघातून बिजाराम किनकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण, आता मनसेने समीर मेघे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
मनसे करणार नाही किनकर यांचा प्रचार
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हिंगणा विधानसभेचे उमेदवार समीर मेघे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर पाठिंबा देत आहे, असे दुरुगकर यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
काही प्रशासकीय अडचणींमुळे बिजाराम किनकर यांची उमेदवारी मागे घेता आली नाही. या पुढे बिजाराम किनकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उेदवार नाही. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणा विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार नाही, अशी माहिती आदित्य दुरुगकर यांनी दिली.
राज ठाकरे मंगळवारी विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय मनसेकडून जाहीर करण्यात आला आहे. मनसेने समीर मेघे यांना पाठिंबा दिला आहे. समीर मेघे हे विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. माजी खासदार दत्ता मेघे यांचे ते सुपुत्र आहेत.