Maharashtra Election 2024 Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला सर्वात मोठे यश मिळाले आहे. यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच राज्यात नवीन सरकारचा शपथविधी होईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त झाल्या असून, या जागांवर कोणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्वाचे आहे.
महायुतीचा 'महा'विजयविधानसभा निवडणुकीत महायुतीने 230+ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केले. भाजपने 132, शिवसेना शिंदे गट 58 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला. तर महाविकासआघाडीला फक्त 47 जागा जिंकता आल्या. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतरांना 12 जागा मिळाल्या आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले होते. यात विधानपरिषदेवर आमदार असलेल्या काही नेत्यांचाही समावेश होता. या निवडणुकीत विधानपरिषदेवरील आमदारांचा विजय झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त झाल्या आहेत. आता या रिक्त जागांवर विधानसभेत डावललेल्या नाराजांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
कोणाच्या किती जागा रिक्त? विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या एकूण सहा जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेतील भाजपचे 4 आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके यांचा यात समावेश आहे. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत. तर, शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांचीही विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधानपरिषदेत रिक्त झाली आहे.
याशिवाय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हेदेखील विधानपरिषदेवर आमदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. यानुसार महायुतीच्या विधानपरिषदेच्या एकूण 6 जागा रिक्त झाल्या आहेत. आता या जागांवर कोणाला संधी मिळणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.