'त्या' ५० जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष्य; विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:01 PM2024-10-08T12:01:17+5:302024-10-08T12:02:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांच्या पारंपारिक गडावर विशेष लक्ष केंद्रीत ठेवले आहे.
पुणे - इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील यांना पक्षात प्रवेश देत शरद पवारांनीभाजपासह पुतण्या अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवार स्वत: निवडणुकीची रणनीती आखत आहेत त्यातूनच कोल्हापूर, इंदापूर आणि येणाऱ्या काळात फलटणमध्येही पवार त्यांची खेळी खेळणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरातील माजी आमदार असून त्यांनी याआधी शिवसेना-भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही काळात मंत्रिपदे भूषावली आहेत. मात्र २०१४ आणि २०१९ यात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केले.
सध्या इंदापूरातील विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. २०२४ मध्ये भरणे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजपाला रामराम केला. साखरपट्टा भाग असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सहकार चळवळीतील नेते म्हणून भाजपाला हर्षवर्धन पाटील यांच्या जाण्याने फटका बसण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात कोल्हापूरात समरजितसिंह घाटगे यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
पक्ष सोडलेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मधुकर पिचड जे शरद पवारांचे निकटवर्तीय होते त्यांनी २०१४ साली भाजपात प्रवेश केला तेदेखील घरवापसीच्या तयारीत आहेत. पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांनी पराभूत केले. सध्या आमदार किरण लहामटे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे वैभव यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता अधिक आहे. मागील काही दिवसांपूर्वी पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्याचेही पुढे आले.
महायुतीमुळे फक्त भाजपालाच नाही तर अजित पवारांनाही फटका बसताना दिसत आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माढ्याचे बबन शिंदे हेदेखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढतील असं सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यातूनच भाजपामध्ये असलेले मोहिते पाटील घराणे पुन्हा शरद पवारांसोबत आले. माढा येथे धैर्यशील पाटील हे खासदार झाले.
राष्ट्रवादीचा पारंपारिक गड मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांनी लक्ष केंद्रीत केले आहे. २०१९ च्या विधानसभेत या भागातील ६७ विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेस-राष्ट्रवादीने ३७ जागा जिंकल्या होत्या, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील १२ जागांपैकी ८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रातील ६७ पैकी किमान ५० जागा जिंकण्याचं लक्ष शरद पवारांनी ठेवले आहे. आता त्यात किती यश मिळते हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.