मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 02:07 PM2024-10-08T14:07:29+5:302024-10-08T14:09:46+5:30
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवारांसह भाजपाला शरद पवारांकडून आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे.
पुणे - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी जागावाटपावर महायुती आणि मविआ या दोन्ही आघाडींच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच इच्छुक उमेदवारांनी आपापली तिकिटे फायनल करण्यासाठी एकापक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे. नुकतेच इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक नेता पवारांच्या भेटीला पोहचल्याची चर्चा सुरू झाली.
शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बाग निवासस्थानातून आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांच्या कारमधील एका व्यक्तीने लक्ष वेधून घेतले. सुप्रिया सुळेंची कार मोदी बागेतून बाहेर पडली तेव्हा माध्यमांचे कॅमेरे तिथे फुटेज घ्यायला पुढे आले. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने माध्यमांपासून चेहरा लपवत फाईल हाती घेतली. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये बसलेली ही व्यक्ती कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांच्या पक्षात आणखी एक मोठा नेता लवकरच पक्षप्रवेश करणार की काय असंही बोललं जात आहे.
शरद पवारांनी इंदापूरात दिले संकेत
इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी आणखी पक्षप्रवेशाचे संकेत दिले होते. पवार म्हणाले होते की, "चित्र बदलतंय. आज हाच कार्यक्रम झाला. निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला. त्यांनी हट्ट केला. इंदापुरला चाललाय, १४ तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे. मी म्हटलं, काय कार्यक्रम आहे? ते म्हणाले, इंदापुरला आहे, तोच आमच्याकडे. म्हटलं कुठे? ते म्हणाले फलटणला", असं शरद पवारांनी सांगितले त्यानंतर हसतच त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, "समजलं का? अशी कोपरखळी पवारांनी मारली
अजितदादांना धक्क्यामागून धक्के
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवारांसह भाजपाला शरद पवारांकडून आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच या धक्कातंत्राची सुरुवात पवारांनी केली होती. बीडचे नेते बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांची साथ सोडली आणि शरद पवारांचे बोट धरून ते लोकसभा लढले व जिंकलेही. अहमदनगर जिल्ह्यातील आमदार नीलेश लंके शरद पवार गटात गेले व खासदार झाले. सोनवणे व लंके यांनी पंकजा मुंडे व सुजय विखे-पाटील यांना पराभूत केले. विधानसभा निवडणुकीपूर्वीही तीच प्रचिती येत आहे. त्यात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके, इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, राजेंद्र शिंगणे, नरहरी झिरवळ यांच्याबाबतही अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.