योगेश पांडे
नागपूर - महायुतीतील २८८ पैकी २७८ जागांबाबत एकमत झाले आहे. १० जागांबाबत अद्यापही भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. भाजपची दुसरी यादी शुक्रवारी घोषित होणार असली तरी या दहा जागांबाबत दोन दिवसांनीच तोडगा निघेल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
गुुरुवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महायुतीकडून तीनही मोठ्या पक्षांनी पहिली यादी घोषित केली. मात्र उर्वरित उमेदवारांची घोषणा कधी होईल याकडे इच्छुकांचे व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याबाबत फडणवीस यांना विचारणा केली असता भाजपची दुसरी यादी बहुदा शुक्रवारी घोषित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. महायुतीची जागावाटपाची बैठक सकारात्मक झाली आहे. २८८ पैकी २७८ जागांबाबत एकमत झाले आहे. केवळ १० जागांवर तोडगा निघायचा आहे. त्या जागांबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. महायुतीचा फॉर्मुला त्यानंतरच घोषित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकासआघाडीचे जागावाटपाचे गणित ठरायचे आहे. ८५-८५-८५ मिळून २७० जागा कशा होतात हे समजण्याचा प्रयत्न सूपर कॉम्प्युटर व गणितज्ज्ञ करत आहेत, असा चिमटादेखील त्यांनी काढला.