MVA Maharashtra Election 2024: मतदारसंघ एक आणि इच्छुक अनेक असे चित्र बहुतांश मतदारसंघात असून, अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांनी माघार घेतली नाही, तर या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे गणित बिघडू शकते आणि विरोधी उमेदवारांसाठी लढत सोप्पी होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीत कोणत्या मतदारसंघात बंडखोरी?
- पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आहे. काँग्रेसचे कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.
-एरंडोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सतिश पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण, या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हर्षल माने यांनी बंडखोरी केली आहे.
-परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण, त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील राजाभाऊ फड यांनी बंडखोरी केली आहे.
-बीड जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच बंडखोरी झाली आहे. शरद पवारांनी या मतदारसंघात संदीप क्षीरसागर यांना पुन्हा संधी दिली. काही दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या ज्योती मेटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनोज जामसुतकर हे भायखळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून बंडखोरी झाली असून, मधु चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
- राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजन साळवी हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पण, त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अविनाश लाड आणि शिवसेनेचेच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उदय बने यांनी बंडखोरी केली आहे.
- जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजय भांबळे यांच्याविरोधात काँग्रेसचे सुरेश नागरे यांनी बंडखोरी केली आहे.
- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनुराधा नागवडे या मविआच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल जगताप यांनी बंडखोरी केली आहे.
- सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंची शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाने दावा करत उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. तर शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना हा मतदारसंघ सोडण्यात तयार नाही.
- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमर पाटील हे अधिकृत उमेदवार आहे. पण, या मतदारसंघात गोंधळ झाल्याचे दिसले. काँग्रेसनेही दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली होती. पण, एबी फॉर्म दिला नाही. दिलीप माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.