पुणे - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडनेउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती तोडली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अडीच वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे गट यांची युती झाली. परंतु दिलेला शब्द पाळला नाही, आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप करत संभाजी ब्रिगेड या युतीतून बाहेर पडली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे म्हणाले की, २०२२ मध्ये संभाजी ब्रिगेडनं ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली होती. लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीचा धर्म पाळत प्रचंड ताकदीने सहकार्य केले. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रचारक, वक्ते फिरले. लोकसभेत महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला, चांगल्या जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत आम्हाला ५-६ जागा देऊ असं उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिले होते. मात्र गेल्या महिनाभर बैठका घेतल्या, आम्हाला ताटकळत ठेवले परंतु कुठलाही निर्णय घेतलेला नाही असा आरोप त्यांनी केला.
तसेच महिनाभरापासूनचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता आपण स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे असं ठरवलं. त्यामुळे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात ५०-६० जागांवर आमचे उमेदवार देणार आहे. संभाजी ब्रिगेडचा विश्वासघात झाला आहे. जो विश्वास आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेवर ठेवला, महाविकास आघाडीवर ठेवला त्याचा विश्वासघात झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा बहुजनांच्या पुरोगामी चळवळी असतील त्यांना आवाहन आहे, त्यांनी महायुतीचं सनातन विषमता आणि महाविकास आघाडीचं बेगडी पुरोगामीत्व यांच्याविरोधात ताकदीने उभे राहिले पाहिजे. हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हे लोक केवळ वाणीत त्यांची नावे घेतात पण कृतीत कुठलेही काम नसते. त्यामुळे जी लोक पुरोगामी विचारांची आहेत त्यांनी संभाजी ब्रिगेडसोबत सहभागी व्हावे असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी केले आहे.
युतीची घोषणा करताना काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
ऑगस्ट २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली होती. त्यावेळी मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले होते की, प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं अनेकजण म्हणतात, आज संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन मोठा इतिहास घडवू. आगामी सर्व निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र मैदानात उतरतील असं त्यांनी सांगितले होते.