Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिकांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. पण, यावरुन महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने जाहिरपणे नाराजी व्यक्त केली आहे. नवाब मलिकांना उमेदवारी देऊ नये, अशी सुरुवातीपासूनच भाजपची भूमिका होती. पण, शेवटच्या दिवशी अजित पवारांनी मलिकांना तिकीट दिले. दरम्यान, आता भाजपने नवाब मलिकांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिकांना मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे महायुतीत मतभेद झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने याच मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला आहे. दरम्यान, भाजपनेही मलिकांचा प्रचार करण्यास साफ नकार दिला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
ANI शी बोलताना आशिष शेलार म्हणाले, "अजित पवारांनी मलिकांना तिकीट द्यायला नको होते, असे महाराष्ट्रातील अनेकांना वाटते. त्यांच्यावरील आरोप गंभीर आणि आरोपपत्र गंभीर स्वरुपाचे आहे. महाराष्ट्र हे कधीही स्वीकारू शकत नाही. भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप अशा लोकांसाठी कधीच प्रचार करणार नाही."
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा
'महाराष्ट्रात अजित पवारांशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही', या नवाब मलिकांच्या वक्तव्यावर शेलार म्हणाले, "नवाब मलिक यांनी हे शिकवू नये. ते जामिनावर आहेत आणि त्यांनी हे लक्षात ठेवावे. सरकार स्थापन होईल आणि हे तिन्ही पक्ष मिळून करतील, यात शंका नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.