उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 09:02 PM2024-10-21T21:02:29+5:302024-10-21T21:05:08+5:30
महायुतीत नांदगाव मतदारसंघात भुजबळविरुद्ध कांदे यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. सुहास कांदे यांचं काम करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटप आणि उमेदवार यादीच्या तयारीसाठी राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू आहे. महायुतीचं जागावाटप अद्याप निश्चित झालं नसलं तरी भाजपाने ९९ जणांनी पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र नांदगाव-मनमाड मतदारसंघात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. याठिकाणी विद्यमान शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते.
नांदगाव मनमाड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदारांच्या उमेदवारीला विरोध करत NCP कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी थेट अजित पवारांचं निवासस्थान गाठत कैफियत मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा देण्यात यावी या मागणीसाठी जवळपास २०० हून अधिक कार्यकर्ते देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले. नांदगावची जागा राष्ट्रवादीला मिळावी अथवा येथील शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. पंरतु, शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार सुहास कांदेंना उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी दादांसमोर मांडली.
नांदगाव मनमाड येथील जनता विद्यमान आमदारांना त्रस्त आहे. मतदारसंघातील जनता दहशतीत असून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लढले पाहिजे असं जनतेची मागणी आहे असा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते समीर भुजबळ यांनी लढावे अशी मागणी होत आहे. जनता नाराज असलेल्याला उमेदवारी देणे चूक ठरेल असं कार्यकर्त्यांनी म्हटलं. मागील काही दिवसांपासून समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघात लढण्याची तयारी करत आहेत. त्यात छगन भुजबळांनीही नांदगाव मतदारसंघासाठी समीर भुजबळांना शुभेच्छा दिल्या होत्या. आज देवगिरी बंगल्यावर जमलेल्या कार्यकर्त्यांकडून भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच कोणत्याही परिस्थिती आपण सुहास कांदेचे काम करणार नाही ,अशी भूमिकाही या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.