मुंबई - भाजपा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना घाबरली आहे. आम्ही एवढा संघर्ष केलाय तो त्यांच्यासोबत जायला केलाय का? आमची लढाई महाराष्ट्राच्या शत्रूशी, ज्यांनी हा महाराष्ट्र लुटला त्यांच्यासोबत आहे. लुटारू टोळीच्या सरदारासोबत आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातील भीती दाखवते. हे षडयंत्र आहे. जे देशाचे संविधान संपवू इच्छितात. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळतायेत, शिवसेना कधीही अशा लोकांसोबत जाणार नाही आणि त्यांच्यासमोर झुकणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत हे अमित शाहांना भेटले अशा बातम्या राजकीय वर्तुळात चर्चेत आल्यानंतर राऊतांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाली हा हास्यास्पद प्रश्न आहे. हा जर काँग्रेस नेत्यांचा दावा असेल तर आम्हाला खरोखर आश्चर्य वाटतं. या शक्तींशी सगळ्यात जास्त कुणी संघर्ष केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे. केवळ संघर्ष केला नाही तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात टाकलं. आमचा पक्ष फोडला. आमचे सरकार पाडले. आमचे चिन्ह चोरले आणि त्यापेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हाती दिला. ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. हा संघर्ष अशा टोकाला आला आहे जर कुणी अशी शंका घेत असेल तर ते एका बापाच्या औलादी नाहीत. मग ते कोणत्याही पक्षाचे असो असा पाणउतारा राऊतांनी केला.
तसेच स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शितोंडे उडवणारे लोक आहेत. बातम्या पसरवून अफवा पसरवून जर कुणी लढत असेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. या बातम्या कुणी पसरवल्या याची माहिती आम्हाला मिळाली आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे अफजलखान, औरंगजेबाशी हातमिळवणी करणे असा घणाघातही संजय राऊतांनी भाजपासोबत जाण्याच्या प्रश्नावरून केला आहे.
दरम्यान, अफवा पसरवल्या जातायेत. प्रतिष्ठित वृत्तवाहिन्या या बातम्या दाखवतायेत. माध्यमावर कशारितीने महाराष्ट्राच्या शत्रूचं नियंत्रण आहे हे दिसते. आमचं मन साफ, विचार स्वच्छ आहे. आम्ही कुणाच्याही दबावाखाली येत नाही. आम्ही जे काही करतो ते छातीठोक करतो. आमच्या २१० जागांबाबत तिन्ही पक्षाचं एकमत झालेले आहे. २१० हा फार मोठा आकडा आहे. त्यामुळे दिल्लीतून कोण तुम्हाला बातम्या पुरवतं हे आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रात आम्ही एकत्र राहायला हवं ही आमची भूमिका आहे. संविधानविरोधी शक्ती, महाराष्ट्र लुटणाऱ्यांचा पराभव आम्ही एकत्र राहून करू असं संजय राऊतांनी महाविकास आघाडीबाबत स्पष्ट केले आहे.