मुंबई - विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच पक्षांमधील हालचाली वाढल्या आहेत. जागावाटप आणि उमेदवारी यादी जाहीर करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. त्यात मनसेनेही या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यासह निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यात शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेत्यांच्या बैठकीचं सत्र सुरू आहे. मनसे नेते अमित ठाकरे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं समोर आलं आहे.
अमित ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढावी अशी मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे आग्रह धरला आहे. त्यात अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून भांडुप आणि माहिम मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. या दोन्ही मतदारसंघात मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. माहिममध्ये २००९ मध्ये मनसे आमदार निवडून आले होते. त्यात माहिम मतदारसंघात अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील तर त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये असं उद्धव ठाकरे गटातील काही नेत्यांचं मत आहे. आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी मतदारसंघात उभे राहिले तेव्हा राज ठाकरेंच्या मनसेने उमेदवार दिला नव्हता.
वरळी मतदारसंघात यंदा आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. भाजपा आणि शिंदेसेनेकडून देशपांडे यांना मदत होऊ शकते असं बोललं जाते. त्यामुळे वरळी कडवी लढत होऊ शकते. परंतु अमित ठाकरे जर माहिम मतदारसंघातून उभे राहिले तर त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर उभे राहण्याची शक्यता आहे. त्यात जर ठाकरेसेनेने या मतदारसंघात उमेदवार न उतरवता अमित ठाकरेंना मदत केली तर या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे. परंतु हे सगळं रणनीतीचा भाग आहे. अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
दरम्यान, ठाकरे कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुखात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे. अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरे कुटुंबासह आले होते, उर्वशी रुग्णालयात दाखल होती तेव्हाही उद्धव आणि राज एकत्र आले होते. ठाकरे कुटुंब नात्याने एकमेकांच्या लांब नसले तरी राजकारणात दोन्ही भाऊ एकमेकांच्याविरोधात उभे आहेत. त्यात माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला नाही तर राज ठाकरे वरळीबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे. परंतु त्याआधी अमित ठाकरे यांना निवडणुकीत उभं राहण्यासाठी राज ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल मिळतो का याची उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.