Maharashtra Election Exit Poll: ...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 07:34 PM2019-10-21T19:34:40+5:302019-10-21T19:36:54+5:30
शिवसेनेला ऐतिहासिक अंदाज मिळण्याचा अंदाज
मुंबई: विधानसभा निवडणुकीचं मतदान संपताच अनेक वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. सर्वच एक्झिट पोल्समधून महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती दोनशेच्या आसपास जागा मिळवेल आणि महाआघाडी शंभरीदेखील गाठू शकणार नाही, अशी आकडेवारी बहुतांश एक्झिट पोल्समधून पुढे आली आहे.
न्यूज18 आणि आयपीएसओएसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला ऐतिहासिक यश मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला 141 जागा मिळतील, असा अंदाज न्यूज18 आणि आयपीएसओएसनं व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला तब्बल 102 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच शिवसेनेच्या आमदारांची संख्या 39नं वाढेल. शिवसेना यंदा 124 जागा लढवत आहे. भाजपासोबत युती केल्यापासून गेल्या 30 वर्षांमध्ये शिवसेनेनं प्रथमच इतक्या कमी जागा लढवल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच इतक्या कमी जागा लढवूनही शिवसेना राजकीय इतिहासात प्रथमच शंभरी पार करेल, असा अंदाज आहे.
न्यूज18 आणि आयपीएसओएसच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीची लाट उसळेल. यामध्ये महाआघाडी भुईसपाट होऊन जाईल. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार काँग्रेसला केवळ 17, तर राष्ट्रवादीला 22 जागा मिळू शकतील. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 42, तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा या दोन्ही पक्षांची पूर्णपणे धूळधाण होऊ शकते, असं सर्वेक्षणातील आकडे सांगतात. याच एक्झिट पोलनुसार एमआयएमला 1 तर इतरांना 3 जागा मिळू शकतात.