मुंबई- राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीयातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असून, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री असतील. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6.40 वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वीच शिवसेना भवनाच्या बाहेर बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधींचे फोटो असलेले पोस्टर्स झळकले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरत आहे. तर दुसरीकडे राज्यात येऊ घातलेल्या नव्या सरकारच्या स्वागतासाठी दादर टीटीमध्येही काँग्रेसकडून काही पोस्टर्स लागले आहेत. त्या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो असून, महाविकास आघाडीच्या सरकारला हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. काही पोस्टर्सवर शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे फोटो झळकले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पंजाबचे कॅप्टन अमरेंद्र सिंग, भूपेश बघेल (छत्तीसगड), व्ही. नारायणस्वामी (पुड्डूचेरी), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) तसेच चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
Maharashtra CM: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीपूर्वीच झळकले बाळासाहेब-इंदिरा गांधींचे पोस्टर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 10:01 AM