शिवसेनेला मोठी लॉटरी; पाच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 09:59 AM2019-11-15T09:59:17+5:302019-11-15T10:02:22+5:30
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
मुंबई - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला असून, सत्तावाटपाचाही फॉर्म्युलाही ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद राहील, असे निश्चित झाले आहे. तसेच मंत्रिपदांच्या वाटपाबाबतचेही धोरण निश्चित झाले आहे. त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 14 तर काँग्रेसच्या वाट्याला 12 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारामध्ये हिंदुत्वाचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र किमान समान कार्यक्रमामध्ये शेतकरी आणि तरुणांशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र काही प्रश्नांवर एकमत होऊ शकलेले नाही.