मुंबई - शुक्रवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींना आज मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा वेग आला आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण दिवसभर बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी असलेले अजित पवार हे मध्यरात्री घरातून बाहेर पडले आहेत. दरम्यान, मागावर असलेल्या माध्यमांना गुंगारा देत अजित पवार हे आपल्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. अजित पवार हे भाजपा नेत्यांना भेटण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत होते. रविवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी संदर्भात अजित पवार हे भाजपा नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भातील अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.
एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकाऱण ढवळून निघाले होते. दरम्यान, काँग्रेस, शिवसेनेने भाजपा-राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली? केंद्र सरकारने राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस कधी केली? राष्ट्रपतींनी केंद्राची शिफारस कधी स्वीकारली? राज्यपालांनी कोणत्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं? मुख्य न्यायाधिशांना शपथविधीला बोलवण्यात आलं नाही? शपथविधी किती वाजता झाली? माध्यमांना का बोलवण्यात आलं नाही? असे असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच या याचिकेत विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलवावं, 24 तासांत फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सभागृहात आवाजी मतदानाने ठराव संमत करू नये. या संपूर्ण घडामोडीचे व्हिडीओ चित्रीकरण कराव अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर रविवारी सकाळी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे.