Maharashtra CM: राजकीय भूकंप : अजित पवारांचे बंड; मुख्यमंत्री देवेंद्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 07:01 AM2019-11-24T07:01:09+5:302019-11-24T07:07:14+5:30

शनिवारची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.

Maharashtra Election, Maharashtra CM: Political earthquake: Ajit Pawar rebellion; Chief Minister Devendra Fadanvis ! | Maharashtra CM: राजकीय भूकंप : अजित पवारांचे बंड; मुख्यमंत्री देवेंद्र!

Maharashtra CM: राजकीय भूकंप : अजित पवारांचे बंड; मुख्यमंत्री देवेंद्र!

Next

मुंबई : शनिवारची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. या बंडखोरीची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे. या बंडखोरीमुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाचे सर्व अधिकार आमदार जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सायंकाळी वाय.बी. चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. पैकी ४२ आमदार या बैठकीला हजर होते आणि सहा आमदार येत आहेत. अजित पवारांसोबत गेलेल्या ११ आमदारांपैकी पाच जणांशी संपर्क होऊ शकला नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले.  अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांना पवई येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविण्यात आले असून ३० नोव्हेंबरपर्यंत तिथे त्यांचा मुक्काम असेल.

...अन् धनंजय मुंडे प्रकटले
अजित पवारांच्या राजकीय भूकंपानंतर ‘नॉट रिचेबल’ असलेले धनंजय मुंडे सायंकाळी राष्टÑवादीच्या बैठकीला हजर झाले. मुंडे यांच्या मंत्रालयाजवळच्या बंगल्यावरच अजितदादांचे बंड शिजले  होते. तेव्हापासून ते बेपत्ता होते. मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे ते दादांची साथ देणार, अशी चर्चा असताना ते बैठकीला आले.

शेलार यांची टीका
माजी मंत्री आशिष शेलार यांनी जयंत पाटील यांच्या निवडीला आक्षेप घेत ती बेकायदा असल्याचा दावा केला. रात्री उशिरा अजित पवार भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दादरला रवाना झाले.

१३ पैकी दहा आमदार परतले!
अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनावर गेले, तेव्हा त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे १३ आमदार होते. त्यात दौलत दरोडा, नरहरी झिरवाळ, सुनील भुसारा, दिलीप बनकर, अनिल पाटील, नितीन पवार, सुनील शेळके, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर, माणिकराव कोकाटे आणि सुनील टिंगरे यांचा समावेश होता. पैकी राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, संदीप क्षीरसागर, नरहरी झिरवाळ, सुनील शेळके, संजय बनसोडे हे बैठकीला हजर होते, तर दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, सुनील टिंगरे, बाबासाहेब पाटील यांनी आपण राष्ट्रवादीसोबत आहोत असे जाहीर केले.

‘काहीही कर, राजीनामा दे’
‘काहीही कर, पण उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दे’ असे भावनिक आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्याआधी सकाळी त्यांनी पक्षात व कुटुंबात फूट असे स्टेटस व्हॉट्सअ‍ॅपवर टाकले होते.

मनधरणीसाठी तटकरे, वळसे-पाटील भेटले
राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिलीप वळसे व सुनील तटकरे यांनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पक्षातील नेते व बाहेरची काही मंडळी त्यांच्या संपर्कात असून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांचा निरोपही त्यांना दिला.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra CM: Political earthquake: Ajit Pawar rebellion; Chief Minister Devendra Fadanvis !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.