- अतुल कुलकर्णीमुंबई : थेट शरद पवार यांच्याविरुद्ध काही केले की त्यांनाच त्याची सहानूभूती मिळते हे ईडीच्या प्रकरणातून लक्षात आल्यामुळे भाजपने त्यांच्याविरुध्द आता ‘अजितअस्त्रा’चा वापर करण्याची योजना आखली आहे. अजित पवार यांना रात्रीतून फोडून त्यांना उपमुख्यमंत्रिपद देत भाजपने थोरल्या पवारांची राजकीय आणि कौटूंबीक कोंडी केली आहे.भाजपच्या विरोधात शरद पवार यशस्वी ठरले तर त्याचे पडसाद देशभर उमटतील. रालोआतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला गळाला लावून पवारांनी एकप्रकारे मोदी-शहा यांच्या वर्चस्वालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्टÑातील हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर राज्यातही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, हे जाणून असलेल्या भाजपच्या धुरिणांनी अजित पवारांच्या माध्यमातून पवारांना चांगलाच शह दिला आहे.राजकीय डावपेचात निष्णात असलेल्या शरद पवारांनी भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटवण्याची तयारी केली आहे. शनिवारी दिवसभर त्यांनी विधिज्ञांशी सल्लामसलत केली. विधिमंडळ गट नेता बदलण्याचा ठराव देखील त्यांच्या सल्ल्यानुसार तयार केला. उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांनी चर्चा केली.सकृतदर्शनी ही लढाई सगळ्यांसाठी अजित पवार विरुध्द शरद पवार अशी दिसत असली तरीही त्यामागे भाजपचे मोठे राजकारण आहे. जर सरकारवरील विश्वास ठराव मंजूर झाला तर आपोआप शरद पवार यांचे राजकारण मर्यादित होईल. त्यांनी भाजपचे सरकार यावे म्हणूनच अजित पवार यांना भाजपमध्ये पाठवले, हा तर त्यांचा स्वभावच आहे, असे वातावरण तयार करुन शरद पवार यांच्या जुन्या प्रतीमेचा वापर करत देशभरात त्यांना टीकेचे लक्ष्य करायचे आणि जर विश्वास ठराव नामंजूर झाला तर अजित पवार यांच्यामुळेच ते झाले. त्यांच्यामागे कोणी नव्हते असे म्हणत सगळे खापर त्यांच्यावर फोडून मोकळे व्हायचे, असाही भाजपचा यामागे डाव आहे.भाजपची ही रणनिती लक्षात आल्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांच्या मनधरणीसाठी त्यांच्याकडे दोन दिवसात तीन वेळा आपले विश्वासू नेते पाठवले. भाजपच्या या खेळीत पवार कुटुंबातील कुणाचीच हार अथवा जीत होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न आहे.
Maharashtra Government: शरद पवारांना कोंडीत पकडण्याची भाजपाची खेळी
By अतुल कुलकर्णी | Published: November 25, 2019 7:53 AM