मुंबई - राज्यात अत्यंत गुप्तपणे सरकार स्थापन केल्यानंतर आता सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपा आणि अजित पवार गटातील सत्तावाटपाचा फॉर्म्युला आणि सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत सुमारे 27 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. जवळपास ५०-५५ मिनिटे या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. राज्यपालांनी कोणत्या कागदपत्राच्या आधारे निर्णय घेतला ते उद्या सकाळी 10.30 पर्यंत सादर करण्यात यावेत असे आदेश कोर्टाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिले आहेत. त्यामुळे सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. तसेच सगळ्या पक्षकारांना कोर्टाने नोटीस जारी केली आहे. त्यामुळे सोमवारी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीची माहिती या भेटीत घेण्यात आली. तसेच अजित पवार यांच्यासोबत 27 आमदार असल्याचे सांगण्यात येत असून, अजित पवार यांच्या गटाला 12 मंत्रिपदे आणि 15 महामंडळे देण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय घडामोडीनंतर अजित रात्री 10.00 वाजता घरातून बाहेर पडले होते. अजित पवारांसमवेत मोठा पोलीस फौजफाटा असून ते थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात पोहोचले. अजित पवार शनिवारी रात्रीपासून घरातच होते, त्यामुळे त्यांच्या घराकडे मीडियासह सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. आज तब्बल 24 तासानंतर अजित पवार घराबाहेर पडले होते. यावेळी, माध्यमांनी त्यांना अडवले, पण त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली. तसेच अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिक मदत देण्याबाबत चर्चा झाली. यासंदर्भात मी सोमवारी मुख्य सचिव आणि वित्त सचिव यांच्याशी चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले.