मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील महाशिवआघाडीकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात एकत्र येऊन सरकार स्थापन करायचे याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. त्याबरोबरच स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळेल. तर संपूर्ण पाच वर्षे काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद राहील. त्याबरोबरच मंत्रिपदे आणि महामंडळांचे समसमान वाटप करण्याचेही निश्चित झाले आहे. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेला प्रत्येकी 14 मंत्रिपदे मिळतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात मंगळवारी रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेमध्ये सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. तसेच अहमद पटेल यांनी काँग्रेसची संस्कृती आणि सरकार स्थापनेतील अटीशर्तींची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. उद्धव ठाकरेंशी झालेल्या बैठकीनंतर अहमद पटेल हे दिल्लीला रवाना झाले. आता या बैठकीबाबतचा अहवाल ते सोनिया गांधी यांना देणार आहेत. त्यानंतर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुढील वाटचालीबाबत फोनवरून चर्चा होऊ शकते.
Maharashtra Government: असा असेल महाशिवआघाडीमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:33 AM