- अतुल कुलकर्णीमुंबई : राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याविषयी स्पष्ट होत नव्हती. काँग्रेसलाही राष्ट्रवादी विषयी संदिग्धता होती. काही दिवसकाँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत म्हणावा तसा संवाद होत नव्हता. त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी हस्तक्षेप केला होता. त्यामुळे राज्याला दिशा देणारे राजकारण बदलले. मात्र या राजकारणाला अजित पवार यांनी पुन्हा वेगळे वळण लावले आहे.राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक शरद पवार यांनी बोलावली होती. त्या बैठकीत आपण शिवसेनेसोबत जायचे की भाजपसोबत असा प्रश्न पवारांनी सगळ्या नेत्यांना विचारला. त्यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि अजित पवार या नेत्यांनी आपण भाजप सोबत गेले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. उर्वरित नेत्यांनी आपण शिवसेनेसोबत गेले पाहिजे असे सांगितले होते. तेव्हा शरद पवार यांनी नवाब मलिक यांना देखील हाच प्रश्न विचारला होता. मलिक यांनी मुस्लीम समाज दोघांच्याही विरोधात आहे, मात्र आजच्या राजकीय परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ न देण्यासाठी आपण शिवसेनेसोबत जावे असे आमच्या समाजाला वाटते अशी प्रतिक्रिया दिली होती.हे सगळे होत असताना पवारांनी नेत्यांच्या मनातली अस्वस्थता ओळखून घेतली होती. ते देखील काय करावे याबद्दल साशंक होते. त्याच काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघेही शरद पवार यांना भेटले. त्या भेटीनंतर प्रतिभातार्इंनी शरद पवार यांना एक जुनी आठवण सांगितली. सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला उभ्या होत्या, भाजपने त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करून सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आपण ठाम उभे असल्याचे सांगितले होते. हा प्रसंग प्रतिभातार्इंनी शरद पवार यांना सांगितला. आज बाळासाहेबांचा मुलगा एकटा पडला आहे, त्याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. कोणतेही राजकारण न आणता आपण त्याला मदत केली पाहिजे असा आग्रह प्रतिभातार्इंनी धरला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने शरद पवार यांनी पूर्णपणे शिवसेनेला सोबत घेऊन पुढची राजकीय आखणी सुरू केली होती.मात्र तिकडे अजित पवार यांच्या मनात वेगळेच द्वंद सुरू होते. ज्यावेळी ईडीने शरद पवार यांना नोटीस दिली आणि शरद पवार यांनी या कार्यालयात जाण्याची भूमिका घेतली, त्यावेळी शरद पवारांची लोकप्रियता टिपेला गेली होती. त्यादिवशी अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन माध्यमांचा फोकस पूर्णपणे बदलून टाकला होता. ती देखील भाजप आणि अजित पवार यांच्या समजुतीतून पुढे आलेली खेळी होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देणे हे देखील त्याच राजकारणाचा एक भाग होता. त्याच काळात अजित पवार यांच्याविरोधात दाखल झालेले गुन्हे त्यांच्याविरुद्ध ईडीची नोटीस येऊ शकते, अमुक-तमुक कागदपत्रे सापडली आहेत, अशा पद्धतीचे संदेश त्यांच्यापर्यंत देणे सुरू झाले होते. त्या सगळ्या काळात अजित पवार प्रचंड मानसिक दडपणाखाली होते. आपल्याला जर अटक झाली आणि जर आपली अवस्था छगन भुजबळ किंवा पी. चिदंबरम यांच्या सारखी झाली तर काय? या कल्पनेने ते प्रचंड अस्वस्थ होत होते. काहींना त्यांनी ही भावना बोलूनही दाखवली होती.शनिवारी सकाळी जेव्हा अजित पवार यांनी शपथ घेतली आणि बंड केले ही माहिती शरद पवार यांना कळाली, तेव्हा ते प्रचंड नाराज झाले होते. सुप्रिया सुळे जेव्हा पवारांना भेटल्या, त्या वेळी त्यादेखील स्वत:ला सावरू शकल्या नाहीत. शरद पवार यांच्या खांद्यावर डोके ठेवून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली होती.सोनिया गांधींनी दाखवला विश्वासशिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव जेव्हा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना दिला, तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला होता. मात्र शरद पवार यांनी त्यांची भेट घेत, महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यामुळे देशभरात चांगला संदेश जाईल, असे सांगितले होते. त्यांच्या चर्चेनंतर सोनिया गांधी यांनी अहमद पटेल यांच्या समक्ष सांगितले होते की, शरद पवार यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी जी काही मदत करावी लागेल ती काँग्रेसने करावी. तुम्ही त्यांच्या सोबत राहा, इतक्या स्पष्ट शब्दात सोनिया गांधींनी त्यांना परवानगी दिली होती.
Maharashtra Government: प्रतिभाताईंचा हस्तक्षेप, सुप्रियांचे अश्रू... आणि पवारांची खेळी, पडद्याआड घडले काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 5:34 AM