मुंबई : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने अपक्ष व सहयोगी पक्षांसह १६२ आमदारांच्या संख्याबळावर राज्यात तत्काळ सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र सोमवारी राजभवनात सादर केले.शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात हे पत्र सादर केले. या वेळी अशोक चव्हाण, खा. विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, के.पी. पाडवी आदी उपस्थित होते.२३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली; परंतु पूर्वी विधानसभा सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शवली होती. आजदेखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरतील. त्यामुळे आम्ही आताच सरकार स्थापनेचा दावा करीत आहोत. शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस व सहयोगी आणि अपक्ष सदस्य यांची सह्यांनिशी यादी सोबत जोडत आहोत. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्यास तत्काळ पाचारण करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.दूध का दूध, पानी का पानीएकनाथ शिंदे म्हणाले की, फडणवीस यांनी घेतलेली शपथ लोकशाहीविरोधी आहे. त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ पूर्वीही नव्हते व आजही नाही. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असून, राज्यपालांनी वेळ वाढवून दिला नाही. आता विधानसभेत आम्ही दूध का दूध, पानी का पानी सिद्ध करू.
Maharashtra Government: महाविकास आघाडीने केला सत्तास्थापनेचा दावा, राज्यपालांकडे पत्र सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 6:43 AM