नागपूर - सर्व माणसांना माहित आहे की, निसर्गाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपणचं नष्ट होऊ. पण निसर्गाची हानी करण्याचं काम थांबताना दिसत नाही. तसेच आपापसात भांडण करुन दोघांची हानी होते, तरीही आपापसतील भांडण मिटविण्याचं काम होत नाही असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. मात्र या वक्तव्याचा अर्थ काढला तर सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीशी जोडला जात आहे. मोहन भागवत यांचा रोख शिवसेना-भाजपावर होता अशी चर्चा सुरु आहे.
यावेळी मोहन भागवत म्हणाले की, स्वार्थ खूप वाईट गोष्ट आहे हे सर्वांना माहित आहे, पण काही मोजकेच लोक असतात जे स्वार्थ सोडतात. यामध्ये देशाचं उदाहरण घ्या किंवा व्यक्तीचं असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांचे कान टोचण्याचं काम केलं आहे.
त्याचसोबत शिक्षणातूनच विकास, सुख आणि मुक्ती अपेक्षित आहे. प्रत्येकजण चांगला बनण्याचा विचार करतो. मात्र, माणसामध्ये अहंकार असतो. माणूस प्रत्येक गोष्टीवर त्याचे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतो. तो कोणालाही काही देऊ इच्छित नाही. जरी दिले तरी कमीत कमी कसे देता येईल हे पाहतो. ही हुशारी केवळ त्याच्याकडेच असल्याचे भागवत म्हणाले.
राज्यातील सत्तासंघर्षावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात दरी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन या दोन्ही पक्षातील संवाद तुटला. हा वाद इतका विकोपाला गेला की, केंद्रीय मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला. शिवसेना खासदारांची जागा विरोधी बाकांवर केली. एनडीएच्या बैठकीचं आमंत्रणही शिवसेनेला देण्यात आलं नाही या सगळ्या परिस्थितीवरुन मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरित्या भाष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
गेल्या ३० वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. मात्र गेल्या ५ वर्षापासून भाजपा-शिवसेना यांचे संबंध ताणले गेले आहेत. सत्तेच्या वाट्यावरुन हे दोन्ही पक्ष आमनेसामने आलेले आहेत. राज्यातील सत्तास्थापनेदरम्यान संघाने मध्यस्थी करावी अशी भूमिकाही भाजपाने घेतली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने संघानेही या संघर्षात न पडणं पसंत केलं. त्यामुळे मोहन भागवत यांचा रोख शिवसेना-भाजपाकडेच होता हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं.