Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत शरद पवारांनी दिले मोठे संकेत; सरकार बनविण्याची प्रक्रिया सुरु मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 12:39 PM2019-11-15T12:39:43+5:302019-11-15T12:40:51+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. सरकार चालवताना या मुद्द्यावर आम्ही कायम राहू.
नागपूर - राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु आहे. किमान समान कार्यक्रम या मुद्द्यावर हे तीन पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होत आहे. लवकर सरकार स्थापन होईल, आम्हाला राज्यपालांनी ६ महिन्याचा अवधी दिला आहे असा चिमटा काढत हे सरकार पुढील ५ वर्ष टिकेल याच दृष्टीकोनातून चर्चा सुरु आहे असे सकारात्मक संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. सरकार चालवताना या मुद्द्यावर आम्ही कायम राहू. मुस्लिम आरक्षणासंदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये चर्चा करू. सरकार केव्हा स्थापन होईल ते सांगू शकत नाही. परंतु मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न असेल. येणारे सरकार तकलादू नसेल. महिला मुख्यमंत्रीसंदर्भात काहीच विचार नाही. शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कुणाशीही चर्चा करणार सुरु नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
NCP leader Sharad Pawar on Maharashtra government formation: The process to form government has begun, the government will run for full 5 years. pic.twitter.com/fJ8HOD6u9N
— ANI (@ANI) November 15, 2019
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून भाजपावर एकतर्फी टीकेचा कार्यक्रम सुरु होता. मात्र आता अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेविरोधात टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. जे 'मातोश्री'वरुन कुणी कुटुंबातील व्यक्ती म्हणून राज ठाकरेंना भेटायला जात नव्हते, मात्र आता माणिकराव ठाकरेंनाही भेटण्यासाठी, सत्तेच्या लालसेपोटी हॉटेलमध्ये जात आहेत असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.