- नंदकिशोर पाटीलमुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्टÑातील सत्तासंघर्षात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली. राजकीय डावपेचात अजुनही तेच बाजीगर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता राष्टÑीय राजकारणातही पवारांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडे स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र, भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही, ही बाब स्पष्ट होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा मुद्दा पुढे करून भाजपची कोंडी केली.नेमकी हीच संधी साधत शरद पवारांनी आपले सर्व राजकीय कौशल्य आणि अनुभव पणाला लावत पटावरील सोंगट्या फिरवल्या आणि शिवसेनेच्या पाठिशी स्वत:च्या पक्षासह काँग्रेसलाही उभे केले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीची महाविकास आघाडी झाली असली तरी या आघाडीला काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा पाठिंबा मिळविणे ही अशक्यप्राय बाब होती. मात्र, शरद पवारांनी आधी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल या काँग्रेस नेत्यांचे मनपरिवर्तन केले आणि त्यांच्या माध्यमातून सोनिया गांधींचा पाठिंबा मिळविला.शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला राजी करण्याचे मोठे दिव्य कार्य पार पाडल्यानंतर महाआघाडीचे सत्तावाटप आणि किमान समान कार्यक्रम तयार करण्यातही पवारांची महत्वाची भूमिका बजावली.मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग येताच अजित पवारांनी बंड केले. रात्रीतून भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता. ज्या प्रमाणे १९७८ साली पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार रातोरात पाडले होते. त्याचीची पुनर्रावृत्ती अजित पवारांनी केली.शक्तिप्रदर्शन यशस्वी ठरले!राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या आमदारांना एकत्रित ठेवणे आवश्यक होते. अजितदादांच्या सोबत गेलेले आमदार परत पक्षात आणण्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्यासोबत १६२ आमदार आहेत, हे दाखविण्यासाठी सोमवारी आघाडीच्या सर्व आमदारांचे शक्तिप्रदर्शन पवारांनी घडवून आणले. हा ‘मास्टरस्ट्रोक’ होता. कारण तिथेच अजित पवार आणि भाजपचे अवसान गळाले.विश्वासार्हतेचा प्रश्नअजितदादांच्या बंडामागे शरद पवारांचाच हात असल्याची चर्चा सुरू झाल्याने राष्टÑवादी काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्षातही संभ्रम निर्माण झाला होता. आपली फसवणूक तर झाली नाही ना? अशी भावना काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये होती.मात्र, राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या पवारांनी राष्टÑवादीच्या गटनेतेपदी जयंत पाटील यांची निवड करून अजित पवारांना पहिला धक्का दिला. सर्वांना विश्वासात घेऊन अवघ्या ७९ तासात अजित पवारांचे बंड मोडून काढले.घटनातज्ज्ञांची मदतराज्यातील सत्तापेच कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर शरद पवारांनी देशभरातील घटनातज्ज्ञ, कायदे पंडित आणि अनुभवी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. गटनेत्याची निवड आणि व्हीपचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आधीच तजविज करून ठेवली होती. पक्षाचे सर्व आमदार आपल्यासोबत आणणे आणि कायदेशीर लढाईत बाजी मारून त्यांनी अजित पवारांना ‘योग्य’ तो संदेश दिला. शिवाय, भाजपचे आॅपरेशन लोट्सही हाणून पाडले.
Maharashtra Government: सत्तानाट्यात शरद पवारांचे डावपेच झाले यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 6:37 AM