मुंबई -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा नि्काल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांचा २४ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला हा अयोध्या दौरा आता लांबणीवर प़डला आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना होत आला तरी अद्याप राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. या निव़़डणुकीत भाजपा आणि शिवसेना महाय़ुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याने शिवसेनेने भाजपाची साथ सोडली होती. मात्र राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी होण्यास उशीर होत आहे.
गतवर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. दरम्यान अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. हा दौरा २४ नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र राज्यात सत्तास्थापनेस विलंब होत असल्याने हा दौरा लांबणीवर पडला आहे. तसेच दौऱ्याची पुढील तारीखही अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.