मुंबई : राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ न दिल्याचा आरोप करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार असून न्यायमूर्ती शरद बोबडे ही सुनावणी घेणार आहेत.
शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र, त्या पक्षांनी पत्रे दिली नव्हती. यामुळे शिवसेनेने तीन दिवसांची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ही वेळ नाकारत राष्ट्रवादीलाच सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, राष्ट्रवादीनेही वेळ वाढवून मागितल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
दरम्यान शिवसेनेची याचिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल हे लढविणार असून सरकारी पक्षाकडून निशांत काटनेश्वर हे युक्तीवाद करणार आहेत. काटनेश्वर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिव सेनेने राज्यापालांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केल्याचे समजले असून अद्याप त्याची प्रत मिळालेली नाही. ही प्रत मिळाल्यानंतर त्यामधील आरोप, मुद्दे वाचून पुढील पाऊल उचलले जाणार आहे.
तर शिवसेनेचे वकील राजेश इनामदार यांनी सांगितले की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे समजते आहे. आता यावर कायदेशीर लढा होऊदे. आम्ही यावरही गरज लागली तर याचिका दाखल करू आणि कायदेशीर मदत घेऊ.