मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटेल असं चित्र दिसत आहे. मात्र अद्यापही काँग्रेसच्या हायकमांडकडून अंतिम निर्णय आला नाही. शिवसेनेसोबत सरकारमध्ये जाण्यास सोनिया गांधी अद्यापही तयार नाही. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार पडत आहे. त्यानंतर सोमवारी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्याचसोबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचीही बैठक होणार आहे तर दुसरीकडे भाजपानेही सरकार बनविणार असल्याचा दावा केला आहे.
राज्यात सरकार बनविण्यासाठी निर्णायक बैठक शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात होणार आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा हे सोनिया गांधी यांच्या इच्छेविरोधात आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तयार केलं आहे. पण सोनिया गांधी या नवीन समीकरणामुळे नाराज असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणं आहे की, अद्यापही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील नवीन समीकरणाला मान्यता दिली आहे. अंतिम निर्णय अद्यापही बाकी आहे. तसेच काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे हेदेखील सोनिया गांधी यांना आवडलं नाही.
त्याचसोबत महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या नेत्यांच्या बैठकीत तयार झालेल्या किमान समान कार्यक्रमातील काही मुद्द्यावर काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना आक्षेप आहे. शरद पवारांशी भेट झाल्यानंतर या बैठकीत ते या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक यशस्वी झाली तर शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल देसाई हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेही सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
काँग्रेस नेत्यांमुळे राज्यपाल भेटीचा कार्यक्रम रद्द राज्यातील ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते राज्यपालांची भेट घेणार होते. शनिवारी दुपारी ही भेट होणार होती. मात्र काँग्रेस नेते अनुपस्थित असल्याने ही भेट रद्द करावी लागली. काँग्रेसचा कोणताही वरिष्ठ नेता मुंबई नसल्याने ही भेट रद्द झाल्याचं सांगण्यात आलं.
भाजपाशिवाय कोणाचं सरकार येणार नाही दादरमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक गेल्या तीन दिवसांपासून सुरु होती. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाशिवाय राज्यात कोणाचं सरकार येणार आहे. सरकार आपलचं येणार आहे असा दावा केला. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हा दावा केला.