मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारची शनिवारी (दि.३०) शक्तिपरीक्षा होणार आहे. सरकारतर्फे विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. त्यासाठी विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलविण्यात आले आहे.अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. उद्या दुपारी २ वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय होईल.त्यानंतर, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडतील. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. रविवारी सकाळी ११ वाजता पुन्हा विधानसभेचे अधिवेशन भरेल. त्यात आधी अध्यक्षांची निवड केली जाईल. विरोधी पक्षनेत्याची निवड होईल. दुपारी ४ वाजता राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर, अधिवेशन संस्थगित होईल.नागपूर अधिवेशन एक आठवड्याचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणार आहे. याचा अर्थ, केवळ एक आठवड्याचे हे अधिवेशन असेल.
ठाकरे सरकारची आज शक्तिपरीक्षा, विश्वासदर्शक ठराव मांडणार; दोन दिवसांचे विशेष अधिवेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 4:27 AM