मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर अंतिम चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी शिवसेनेशी बोलण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचसोबत शिवसेनेने आमदारांना २२ नोव्हेंबरला मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण यावेळी येताना ओळखपत्रासह ५ दिवसांचे कपडे घेऊन येण्यास सांगितले आहे.
याबाबत बोलताना शिवसेना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, २२ तारखेच्या बैठकीसाठी मुंबईत शिवसेनेचे आमदार येणार आहेत. २-३ दिवस आमचा मुक्काम मुंबईत असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील हे खात्रीशीर सांगू शकतो असं त्यांनी सांगितले. तसेच २५ नोव्हेंबरला शपथविधी होण्याचीही शक्यता त्यांनी बोलून दाखविली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यास पाठिंबा आहे, हे सूचित करणारे आमदारांचे निळ्या शाईतील सहीचे स्वतंत्र पत्र सादर करावे, तसेच आमदारांच्या सह्या जबदस्तीने किंवा अन्य माध्यमांतून घेण्यात आलेल्या नाहीत, असे प्रमाणित करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची प्रतिस्वाक्षरी या पत्रांवर असावी, अशी अट राज्यपालांनी घातली आहे.
राज्यपालांच्या या अटीने पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या संयुक्त विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना विलंब होत आहे. या अटीनुसार आमदारांची वैयक्तिक स्वाक्षरी मिळविण्यासाठी नेते धावपळ करीत आहेत. मात्र पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी काही आमदारांनी आपल्या मागण्या पक्षनेतृत्वापुढे रेटल्या असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. आमदारांची ओळख परेड घेण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे. मात्र त्याऐवजी आपापल्या पक्षांच्या प्रत्येक आमदाराच्या पाठिंब्याचे सहीनिशी पत्र सादर करण्यास या पक्षाच्या नेत्यांना सांगितले आहे. पूर्वीच्या काही राज्यपालांनीदेखील हीच पद्धत अवलंबिली असल्याने या पक्षांचा नाईलाज झाला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांना आधारकार्ड, ओळखपत्र सोबत आणण्यास सांगितलं असावं असंही बोललं जातं आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना दिल्ली आणि मुंबईत वेग आला असून राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार का हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.