मुंबई - अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. आज रात्री तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. दरम्यान, नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता दादर येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
मंगळवारी रात्री सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे हे 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले. तसेच आपल्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू असली तरी त्याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी होणार असल्याचे सांगितले.
आवश्यक संख्याबळ पाठीशी नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या. तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांसह अन्य मित्रपक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.
महाराष्ट्र विकास आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी दिलेले पत्र