- यदु जोशी ‘एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही’, हा आपले पिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द केवळ ५६ आमदार निवडून आलेले असतानाही खरा करून दाखवित असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठी बाजी जिंकत आणली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा ५६ आमदारांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळेल, असे कोणी म्हटले असते तर त्याचे हसेच झाले असते पण भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावत आता उद्धव मुख्यमंत्री होऊ घातले आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि चिरनिद्राही घेतली त्याच शिवाजी पार्कवर (शिवतीर्थ) उद्धव हे शपथ घेणार हे आता दृष्टिपथात आहे. हजारो शिवसैनिक त्या प्रसंगाचे साक्षिदार असतील.बाळासाहेबांसारखी आक्रमकता नाही, त्यांच्यासारखी वक्तृत्वशैलीदेखील नाही, बाळासाहेबांच्या तुलनेने अगदीच मवाळ वाटणारे उद्धव हे वडिलांचे राजकारणातील वारसदार म्हणून यशस्वी होणार नाहीत, बाळासाहेबांनंतर शिवसेना राहणारच नाही, उद्धव यांच्या तुलनेत त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे वारसदार शोभतात वगैरे टीका अनेकदा झाली. त्या सर्व टीकाकारांची तोंडे बंद करीत आज उद्धव हे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळवून देत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या पालखीचे आम्ही आधी भोई होतो आता या पालखीत आमचाच मुख्यमंत्री बसेल, हा निर्धार त्यांनी नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये सिद्ध केला आहे.शिवसेना म्हटली की शिवराळ भाषा, शिवसेना म्हटली की काचा फोडणे, काळे फासणे, शिवसेना म्हटली की दंगल अशी या पक्षाची वर्षानुवर्षांची ओळख. शांत, संयमी, हसतमुख उद्धव यांनी ती बदलली. शिवसैनिकांच्या आक्रमकतेचे नेहमीच कौतुक व समर्थन करताना ती आक्रस्ताळी होता कामा नये, असा दंडक घालून दिला. ठाकरे घराण्यात कोणीही निवडणूक लढत नाही, ही परंपरा मोडीत काढत त्यांनी मुलगा आदित्य यांना आमदार केले आणि आज ते स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. ठाकरे घराण्यातील हे मोठे स्थित्यंतर उद्धव यांनी केले.शिवसेना म्हणजे ‘ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण’असे बाळासाहेब म्हणत असत. त्याची कास धरत उद्धव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नेहमीच हात घातला. मी मुंबईत राहतो मला शेतीचे काही कळत नाही पण शेतकऱ्यांचे दु:ख मला समजते’ असे सांगत त्यांनी गेल्या पाच वर्षांत सत्तेत असूनही अनेकदा सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. त्यातून त्यांनी शेतकºयांमध्ये स्वत:च्या नेतृत्वाबद्दल विश्वासाची पेरणी केली. भगवा टिळा लावून भगवा दुपट्टा गळ्यात टाकत ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत भारावलेला शिवसैनिक ही शिवसेनेची खरी ताकद आहे अन् मी त्याच्यासमोर नतमस्तक होतो असे सांगत त्यांनी शिवसैनिकांशी असलेली नाळ नेहमीच जपली.जेव्हा युद्ध आमनेसामने जिंकता येत नसते तेव्हा ते गनिमी काव्याने जिंकायचे असते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा वापर करीत ठाकरे यांनी भाजपवर मात केली आहे. मात्र हे करताना वर्षानुवर्षे ठाकरे घराण्याने ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला त्या काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत त्यांना घ्यावी लागली. बाळासाहेबांना दिलेल्या शब्दानुसार शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे हा उद्धव यांचा भावनिक विजय आहे पण तात्विक पराभव म्हणावा लागेल.सत्ताकारणासाठी भिन्न विचारांच्या पक्षांची साथ घेतली पण शिवसेनेचा लढाऊ स्वभाव बदलणार नाही हे पुढील काळात सिद्ध करण्याचे मोठे आव्हान उद्धव यांच्यासमोर असेल. ठोकशाहीवर विश्वास असणाºया शिवसेनेचे कर्णधार असलेल्या उद्धव यांना बहुपक्षांच्या साथीने लोकशाहीच्या चौकटीत आता कारभार करावा लागणार आहे. राजकारणात ‘जो जिता वही सिकंदर’ हेच खरे असते आणि उद्धव हे आज सिकंदर ठरले आहेत हे मात्र मान्यच करावे लागेल.
Maharashtra Government: उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करून दाखवला!
By यदू जोशी | Published: November 27, 2019 5:46 AM