मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप न सुटल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच किमान समान कार्यक्रम हे सूत्र ठेऊन राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार चालविण्यासाठी एकत्र येणार आहे असं चित्र निर्माण झालं. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीच्या बैठकीतच हा अंतिम निर्णय अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे.
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा शिवसेनेचे नेते वारंवार देत असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. अशातच पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांना एकत्र आणून सरकार बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या याबाबत काँग्रेसच्या नेत्यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यात नवीन समीकरण उदयास येणार की नाही हे ठरणार आहे असं सांगितलं. त्यामुळे अद्यापही राज्यातील सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय बाकीच आहे.
शनिवारी ओला दुष्काळाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते एकत्ररित्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र ऐनवेळी काँग्रेस नेते मुंबईत उपलब्ध नसल्याने ही भेट रद्द करण्यात आली. बैठक रद्द होण्याचं कारण काँग्रेस नेत्यांनी वेगळं सांगितले असलं तरी याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तत्पूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलून अंतिम निर्णय होईल असं सांगितले आहे. उद्या याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
दरम्यान, काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा हे सोनिया गांधी यांच्या इच्छेविरोधात आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तयार केलं आहे. पण सोनिया गांधी या नवीन समीकरणामुळे नाराज असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणं आहे की, अद्यापही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील नवीन समीकरणाला मान्यता दिली आहे. अंतिम निर्णय अद्यापही बाकी आहे. तसेच काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे हेदेखील सोनिया गांधी यांना आवडलं नाही त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.