मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता अद्यापही सुटत नसल्याने राज्यात सरकार कोणाचं येणार याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना आपला मुख्यमंत्री बसविण्यात यशस्वी होणार की भाजपा या नव्याने राजकीय समीकरण उदयास येत असताना त्यात बिघाडी करण्यात यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत राज्यात कोण सरकार स्थापन करणार यावरच चर्चा सुरु आहे. यात सोशल मीडियाने आघाडी घेतली आहे. अनेक जोक्स, मीम्स यावर सुरु आहेत. अशातच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन सत्तास्थापनेच्या गोंधळावर भाष्य केलं आहे.
खोपकर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात एक फुटबॉल खेळाडू गोल करताना कशा चालाखीने गोलकिपरला चकवा देताना दिसतो. हा व्हिडीओ पोस्ट करुन अमेय खोपकर यांनी लिहिलं आहे की, हा व्हिडीओ तुम्ही दोनदा पाहाल असा माझा दावा आहे. हा शरद पवार स्टाइल गोल आहे असं मार्मिक भाष्य केलं आहे.
सध्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलेले शरद पवार यांच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरुन तेढ निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे. राज्यात भाजपाला १०५, शिवसेना - ५६, काँग्रेस- ४४ तर राष्ट्रवादी ५४ जागी निवडून आले आहेत. सरकार बनविण्यासाठी १४५ आमदारांचा बहुमताचा आकडा असणं गरजेचा आहे. याचसाठी भाजपाशिवाय राज्यात तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्तास्थापन होणं अशक्य आहे. त्यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात हे कोणालाही ठाऊक नाही. एकीकडे किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे असं सांगितलं जातं तर दुसरीकडे शरद पवार यांनी आमचं अजून काहीच ठरलं नाही तर कॉमन मिनिमम प्रोग्राम कशाला हवाय असं भाष्य करतात. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही पवारांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे या सर्व सत्तासंघर्षाच्या स्पर्धेत शरद पवार नेमका कोणाच्या पारड्यात गोल करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.