Maharashtra Government: उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात मंगळवारी रात्री बैठक, अंतिम फॉर्म्युला ठरला?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 09:41 AM2019-11-13T09:41:32+5:302019-11-13T09:48:05+5:30
शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अजूनही खलबते सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासोबत म्हत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचे वृत्त आहे.
मुंबई - भाजपाची साथ सोडून मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणाऱ्या शिवसेनेला निर्धारित वेळेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळू न शकल्याने शिवसेनेची सत्तास्थापनेचा दावा करण्याची संधी हुकली होती. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अजूनही खलबते सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासोबत म्हत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचे वृत्त आहे. या बैठकीत सरकारस्थापनेचा फॉर्म्युला तसेच त्याच्या अटीशर्तींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Sources: A meeting was held between Shiv Sena chief Uddhav Thackeray and senior Congress leader Ahmed Patel, last night in Mumbai. (file pics) #MaharashtraGovtFormationpic.twitter.com/EsoWA0Iwjh
— ANI (@ANI) November 13, 2019
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. तसेच अहमद पटेल यांनी काँग्रेसची संस्कृती आणि सरकार स्थापनेतील अटीशर्तींची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. उद्धव ठाकरेंशी झालेल्या बैठकीनंतर अहमद पटेल हे दिल्लीला रवाना झाले. आता या बैठकीबाबतचा अहवाल ते सोनिया गांधी यांना देणार आहेत. त्यानंतर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुढील वाटचालीबाबत फोनवरून चर्चा होऊ शकते.
दरम्यान, भाजप-शिवसेनेला संधी देऊनही सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. दिलेल्या मुदतीत राष्ट्रवादीलाही ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आणि राष्ट्रपतींनी त्यावर सायंकाळी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
राष्ट्रवादीला मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, मंगळवारी दुपारीच राष्ट्रवादीने अवधी वाढवून देण्याची विनंती राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी त्यास नकार दिला. सरकार स्थापन करण्यात याप्रकारे तिन्ही पक्ष अपयशी ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली.