Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलामध्ये महायुतीला मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. पहिल्या कलानुसार महायुतीने स्पष्ट बहुमताकडे मुसंडी मारली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
जनतेने महायुतीला विजय मिळवून दिला आहे. त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यामध्ये जे एकत्रितपणे काम केले. त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष लाभाचे राजकारण या दोन्हींचा समतोल महायुतीच्या सरकारने योग्य ठेवला. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी निवडून दिले आहे, असे विनोद तावडे म्हणाले.
पुढे विनोद तावडे म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जनतेचा विश्वास बसला आहे. भाजपा-शिवेसना नैसर्गिक युती होती. ही युती उद्धव ठाकरेंनी २०१९ ला तोडली. त्याचा राग बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता. तसेच, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर टीका करताना विनोद तावडे यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. रोज सकाळी महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करणारं वक्तव्य भांडूपवरून यायचं. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचं धनुष्यबाण, आणि हिंदुत्त्वाचं शिवसेना नाव हिंदुत्त्वाच्या मूळ प्रवाहात असलेल्या भाजपाबरोबर आणले, असेही विनोद तावडे म्हणाले.
दरम्यान, जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात भाजप १२६ जागांवर, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ५५, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) ३९, काँग्रेस २१ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला १८ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.