जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 01:55 PM2024-11-24T13:55:35+5:302024-11-24T13:56:08+5:30

Maharashtra News: बाळासाहेब थोरात अन् पृथ्वीराज चव्हाणांसारख्या दिग्गजांनाही भाजपसमोर हार पत्करावी लागली.

Maharashtra Election Results 2024: Congress lost most of their seats in direct fight with BJP | जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

Maharashtra Assembly Election Result 2024 Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने न भूतो न भविष्यती अशी दमदार कामगिरी केली. 230+ जागा मिळवून महायुतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अनेक राजकीय विश्लेषकांनी आणि एक्झिट पोल्सनी चुरशीच्या लढतीची शक्यता व्यक्त केली होती, पण निकालाच्या सुरुवातीपासून महायुतीने स्तुनामी आणली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती, तिथे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

काँग्रेस चारीमुंड्या चीत
राज्यातील बहुतांश जागांवर शिवसेना vs शिवसेना, राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी आणि भाजप vs काँग्रेस, अशी लढत होती. राज्यातील 288 पैकी 75 मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. या 75 पैकी भारतीय जनता पक्षाने 65 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला फक्त 10 जागा जिंकत आल्या. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका बसला होता. पण, त्यानंतर भाजपने दमदार कमबॅक करत काँग्रेसला चारीमुंड्या चीत केले. 

महाराष्ट्रात भाजपची सर्वोत्तम कामगिरी
या विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 132 जागा जिंकून सर्वांनाच धक्का दिलाय. ही भाजपची महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 105 जागा जिंकल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केली आहे. 2019 मध्ये 44 जागा आणि 2014 मध्ये 42 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा फक्त 15 जागा जिंकण्यात यश आले आहे.

या कारणांमुळे भाजपचा विजय 
या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे श्रेय संयुक्त आणि समन्वित प्रचाराला दिले जात आहे. यामध्ये राज्य आणि केंद्राच्या नेत्यांनी एकत्र काम केले. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य युनिटचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढत होते, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांसारख्या अनुभवी नेत्यांच्या सभांमुळे मतदार एकवटला. 

संघाचे स्थानिक पातळीवर काम
विशेष म्हणजे, या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विशेष काम केले आहे. RSS ने राज्यभरात 60,000 हून अधिक सभांचा समावेश असलेल्या व्यापक मोहिमेद्वारे तळागाळातील लोकांचे समर्थन मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रयत्नामुळे मते एकत्रित करण्यात आणि विरोधकांनी अवलंबलेल्या जाती-आधारित रणनीती निष्फळ करण्यात मदत झाली. याशिवाय, भाजपला त्यांच्या सुव्यवस्थित प्रचार यंत्राचाही फायदा झाला, ज्याने प्रभावी उमेदवार निवड, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि मित्रपक्षांशी सुरळीत समन्वय साधला.

काँग्रेसचे अनेक दिग्गज पराभूत
एकीकडे भाजपचे सूनियोजित व्यवस्थापन अन् दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत कलह, तळागाळातील कार्यकर्त्यांमधील वाद आणि विश्वासार्ह नेतृत्वाचा अभाव, यामुळे काँग्रेसला सर्वात जास्त फटक बसला. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, धिरज देशमुख यांच्यासारख्या दिग्गजांनाही आपल्या जागा वाचवता आली नाही. आता कोकण परिसरात काँग्रेसचा एकही आमदार उरलेला नाही. तर, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रत्येकी एक आमदार आहे. खुद्द प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अवघ्या 208 मतांनी निसटता विजय झाला आहे.

Web Title: Maharashtra Election Results 2024: Congress lost most of their seats in direct fight with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.