मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागले आहे. वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजांनुसार राज्यात भाजपा आणि शिवसेना महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे सुरुवातीच्या कलांमधून दिसत आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर दिली आहे. तसेच आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये भाजपाला फटका बसताना दिसत आहे. तर शिवसेनेने मात्र आपली कामगिरी सुधारत आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात होऊन अडीच तास उलटले आहे. आतापर्यंत आलेल्या २८८ जागांच्या कलांमध्ये भाजपाला १०८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिवसेनेने ७२ जागांवर आघाडी मिळवली आहे. संपूर्ण राज्यात मिळून महायुती १८० जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ५० आणि काँग्रेस ३९ जागांवर आघाडीवर आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि मनसे प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. तर इतर पक्षांना १७ ठिकाणी आघाडी मिळाली आहे. एकंदरीत कल पाहता २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला फटका बसताना दिसत आहे. तर शिवसेनेला मात्र युतीमधून फायदा झाल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकालः सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला धक्का, तर सेनेची मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:52 AM