महाराष्ट्र निवडणूक 2019: ...त्यामुळे देवेंद्र फडणवीस ठरणार महाराष्ट्राचे 'विराट कोहली'!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:48 PM2019-10-22T17:48:31+5:302019-10-22T17:55:49+5:30
Maharashtra elections 2019 महाराष्ट्राचा विराट कोहली म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहता येईल. त्यांनी निवडणुकीत विरोधकांना वर उठूच दिले नाही
- विनायक पात्रुडकर
सध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारतीय दौऱ्यावर आहे आणि भारतीय क्रिकेट संघाने त्यांची पुरती दाणादाण उडवून ‘व्हाईटवॉश’ दिला आहे. तीनही कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या भारतीय संघाने विजय मिळवला. या मालिकेत कोहली आत्मविश्वासाने मैदानावर उतरला. ‘ तो आला, त्याने पाहिले आणि तो जिंकला’ अशा आविर्भावात विराट कोहली खेळला आणि नावाजलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पुरता घायकुतीला आला. पाहुण्यांनी भारतीय संघापुढे अक्षरश: नांगी टाकली. तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसतो आहे. कालच्या एक्झिट पोल मधून ज्यापद्धतीने युतीच्या पारड्यामध्ये वजन टाकले गेलेले आहे. २०० च्या वर जागा मिळणार अशी भविष्यवाणी केली गेली आहे, ती लक्षात घेता महाराष्ट्राचा विराट कोहली म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहता येईल. त्यांनी विरोधकांना वर उठूच दिले नाही, आणि ज्या वेगाने त्यांनी सगळी निवडणूक काबीज केली, प्रचंड सभा घेतल्या, जागोजागी पदयात्रा काढल्या, महाजनादेश यात्रा काढली, शिवाय माध्यमांनाही त्यांनी हाताशी धरले या सगळ्याचा प्रभाव हा त्यांच्या एक्झिट पोलवरुन दिसतो आहे. आणि अर्थातच नांगी टाकलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आणि आत्ता महाराष्ट्रात नांगी टाकलेले विरोध पक्ष यांची गुणवत्ता जवळपास सारखी म्हणता येईल.
शरद पवार आणि काहीप्रमाणात राज ठाकरे वगळता कोणताही दमदार विरोधक हा महाराष्ट्र सरकारपुढे दिसला नाही. त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील असो, स्वत: मुख्यमंत्री असो किंवा शिवसेनेचे नेते असो यांनी जो २०० चा आकडा सांगितला होता तो सहज पार करु शकतील असे चित्र विरोधकांनीच निर्माण करुन दिलेले आहे. कारण या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्ष पूर्ण ढेपाळलेला दिसत होता. राहुल गांधीच्या एक-दोन सभा आणि मनमोहनसिंग यांची एक पत्रकार परिषद वगळता दिल्लीतील कोणताही नेता महाराष्ट्राकडे फारसा फिरकला नाही. त्याचप्रमाणे कॉंग्रेसकडे तसे नेतृत्त्व दिसलेच नाही. सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी येतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनीही महाराष्ट्राचा दौरा केला नाही. या सगळ्याचा परिणाम कॉंग्रेसच्या एकूण नेतृत्वावर आणि कारकिर्दीवर झाला. कॉंग्रेसचे कार्यकर्ते हे फारसे उत्साही दिसत नव्हते. किंबहुना मनाने पराभव स्वीकारला की काय अशी परिस्थिती कॉंग्रेसच्या मंडळींमध्ये होती. त्या तुलनेने त्यांच्याशी आघाडी केलेल्या राष्ट्रवादी पक्षाने मात्र बऱ्यापैकी आक्रमकपणे ही निवडणूक लढविली. स्वत: शरद पवारांनी ७९ व्या वर्षी ज्या तडफेने आणि भरपावसात सभा घेतल्या तो निश्चितच राजकीय पक्षांच्या चर्चेचा विषय ठरला, किंबहुना ते एक प्रभावी माध्यम ठरले. यासगळ्या निवडणुकीमध्ये शरद पवारांची पावसातील सभा जशी गाजली तशीच राज ठाकरेंची पावसामुळे रद्द झालेली सभादेखील गाजली. त्यामुळे उशीरा जागे झालेले राज ठाकरे इलेक्ट्रानिक माध्यमामुळे घराघरात पोहचले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता.
राज ठाकरेंच्या मनसे पक्षाने १०१ जागा लढविल्या. परंतु राज ठाकरेंनी आधीपासून व्यवस्थित नियोजन करुन निवडणूक लढविली असती तर किमान १० त १५ जागा त्यांच्या पदरात पडल्या असत्या हे आत्ताच्या वातावरणावरुन लक्षात येईल. परंतु राज ठाकरे खूप उशीरा मैदानात उतरले. त्यांनी अगदी मोजक्या सभा घेतल्या. त्यामुळे त्यांचे उमेदवार केवळ मते खाण्यासाठीच उभे राहिलेत की काय अशी शंका नंतर निर्माण झाली. अर्थात एक - दोन जागांवर त्यांची टफ फाईट होतीच. परंतु तो फारसा चर्चेचा विषय राहणार नाही. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी वा मनसे असो हे तुलनेने युतीच्या वादळापुढे, युतीच्या प्रचारापुढे, युतीच्या झंझावातापुढे फिके पडले असे चित्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत निर्माण झाले. आणि त्याचाच परिणाम म्हणून युती आरामात २०० ची आघाडी गाठू शकते, असे चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसते आहे. त्यामुळे एक्झिट पोल तुलनेने आत्ता तरी खरा दिसतो आहे. अर्थात याचा प्रत्यक्ष निकाल वा वस्तुस्थिती २४ तारखेच्या निकालामध्ये कळेलच.