Priyanka Chaturvedi Attack On Mahayuti : राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (29 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणाला महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला. दरम्यान, आता यावरुन शिवसेनेच्या (उबाठा) खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीवर हल्लाबोल केला.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “दाऊदचा साथीदार आता आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आला आहे, दाऊदचा मित्र आता अधिकृतपणे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीतून निवडणूक लढवत आहे. देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणारे आज कुठे आहेत?" अशी बोचरी टीका चतुर्वेदी यांनी केली.
नवाब मलिक काय म्हणाले?राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मीडियाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आज मी मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून आधी अर्ज दाखल केला होता, पण पक्षाने एबी फॉर्म पाठवला आणि आज दुपारी 2.55 वाजता अर्ज दाखल केला. मी अजित पवार, सुनील तटकरे यांचा खूप आभारी आहे, मला खात्री आहे की यावेळी आम्ही शिवाजी नगर मतदारसंघ जिंकू."
मलिकांच्या उमेदवारीला भाजपचा विरोधभाजपने टेरर फंडिंग आणि मनी लॉड्रिंगचे आरोप केलेल्या नवाब मलिक यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. पण, आथा मलिकांच्या उमेदवारीला आता महायुतीतून प्रचंड विरोध होत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिकांना पराभूत करण्याचा इशारा दिला आहे. "शिवाजीनगर मानखुर्दचे महायुतीचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार बुलेट पाटील हे आहेत. व्होट जिहाद आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आम्ही लढू", असा थेट इशारा सोमय्यांनी दिला आहे.
नवाब मलिक यांना तिकीट न देण्यासाठी भाजपकडून अजित पवारांवर सातत्याने दबाव टाकला जात होता. यामुळे त्यांनी सुरुवातीला नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिला तिकीट दिले. यानंतर नवाब मलिक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची घोषणा केली. याबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी जाहीरपणे सांगितले होते की, आम्ही कोणत्याही दाऊद समर्थकाला उमेदवार बनवू शकत नाही. पण, अजित पवारांनी अखेर मलिकांना उमेदवारी जाहीर केली. आता इथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.