महाराष्ट्राची निवडणूक अन् नेपाळच्या काठमांडूत बैठक; समोर आला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:46 IST2024-12-21T12:46:06+5:302024-12-21T12:46:41+5:30
जर महायुती पराभूत झाली नाही तर पुढील नियोजन काय करावे याचेही निर्देश या बैठकीत माओवाद्यांना देण्यात आले.

महाराष्ट्राची निवडणूक अन् नेपाळच्या काठमांडूत बैठक; समोर आला धक्कादायक खुलासा
नागपूर - भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवाद्यांचा समावेश होता असा आरोप काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून काँग्रेससह विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा या आरोपांचा उल्लेख करत थेट विधानसभेत काही कागदपत्रे आणि पुरावे दाखवले. त्यात नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या एका बैठकीचाही हवाला देण्यात आला होता. महाराष्ट्रातील निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. या चळवळीतील राज्यातील काही नेते काठमांडूच्या बैठकीत सहभागी झाले होते. आता याबाबत आणखी धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
हरियाणा निकालानंतर आणि महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी १२ ते १४ या कालावधी काठमांडूच्या कांतीपूरमध्ये माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात राज्यात महायुतीचं सरकार आलं तर सरकारविरोधी वातवरण कसं तयार करायचं यावर विचारमंथन केले गेले. या बैठकीतला भारत, बांगलादेश, नेपाळमधील सदस्य हजर होते. त्यात निकालानंतरच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
ईव्हीएम आणि शहरी नक्षलवादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केले. त्यात नेपाळमधील बैठकीचा उल्लेख करण्यात आला. ही बैठक माओवाद्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील होती. त्यात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादीचे नेते भारत, नेपाळ, बांगलादेशसह मणिपूरमधील युनिटही सहभागी होता. विशेष म्हणजे या बैठकीला भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले, महाराष्ट्रात संविधान बचाओ असा नारा देणारे ४ ते ५ जण सहभागी झाले होते. निवडणुकीत भाजपा महायुतीचा पराभव करण्यासाठी प्रचारही केले जात होते. जर महायुती पराभूत झाली नाही तर पुढील नियोजन काय करावे याचेही निर्देश या बैठकीत माओवाद्यांना देण्यात आले.
काय आहे प्लॅनिंग?
पहिल्या टप्प्यात प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून ईव्हीएमविरोधात आरोप करून संशयाचे वातावरण तयार करायचे
दुसऱ्या टप्प्यात EVM विरोधात महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतर राज्यातूनही आवाज बुलंद करून निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यासाठी आंदोलन उभे करायचे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारवर नाराज विविध समाज घटकांना एकत्रित आणून रस्त्यावर सरकारविरोधी वातावरण निर्माण करायचे
चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अराजकतेची स्थिती निर्माण झाली असं सांगत सरकारविरोधात आरपारची लढाई उभी करायची असं सर्व प्लॅनिंग नेपाळच्या बैठकीत ठरलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
१५ नोव्हेंबरला नेपाळची राजधानी काठमांडू येथे एका बैठकीचं आयोजन केले होते. त्यात अशा संघटना सहभागी झाल्या होत्या ज्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा भाग राहिल्या होत्या. बैठकीत ईव्हीएम विरोध आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारविरोधात कट रचला गेला. भारत जोडो यात्रेतील १८० संघटनांपैकी ४० संघटनांना काँग्रेसच्या काळात फ्रंटल संघटन घोषित केले होते. या संघटना महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी प्रचार करत होत्या असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आवाहन केले होते. मी तुमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करत नाही, परंतु तुमचा खांदा तुम्ही कोणाला देताय याचा विचार करावा. सरकार येईल-जाईल परंतु हा देश राहिला पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलं.
संजय राऊतांचा पलटवार
नेपाळ, काठमांडूचे कौतुक भाजपा आणि आरएसएसला खूप होते. त्यामुळे तुम्ही ते वाचवायला हवं होते. नेपाळसोबत आपले भावनिक आणि धार्मिक संबंध आहेत. त्याठिकाणी चीन किंवा पाकिस्तानचा प्रभाव वाढला असेल त्याला जबाबदार गेल्या १० वर्षातील मोदींची धोरणे आहेत. नेपाळसारखा देश तुम्हाला सांभाळता आला नसेल तर हे तुमचे अपयश आहे. तिथे माओवाद्यांचा प्रभाव वाढला म्हणजे चीनचा प्रभाव वाढला. भारत कमकुवत झाला तिथे विश्वगुरू काय करतायेत? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
त्याशिवाय मी स्वत: राहुल गांधींसोबत २८ किमी चाललोय. मी शहरी नक्षलवादी आहे का हे सांगावे. पुण्यातून अमोल पालेकर यात्रेत सहभागी झाले होते मग ते शहरी नक्षलवादी झाले का, हातात सत्ता आहे म्हणून काहीही तोंडाला येते ते बोलता..कुठे आहे शहरी नक्षलवाद? आम्ही नक्षलवाद संपवला असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले, तुम्ही त्यांनाच आव्हान देताय. आम्ही सगळे भारत जोडो यात्रेत होतो. समाजातील प्रत्येक घटक यात्रेत सहभागी होता. बऱ्याच ठिकाणी शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले ते शहरी नक्षलवादी आहेत का असा सवाल राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला.