मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता केवळ काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, विधानसभेचा संभाव्य निकाल काय असेल, याबाबत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. तसेच विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमधूनही संभाव्य निकालाचा कल सांगितला जात आहे. दरम्यान, आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीने व्हीडीपीएच्या हवाल्याने एक एक्झिट पोल प्रसारित केला असून, या पोलमधूनसुद्धा राज्यात भाजपा आणि शिवसेना महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्यासह पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.व्हीडीपीएच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपाला 126 ते 135 जागा मिळतील. तर शिवसेनेला 79 ते 88 जागा मिळतील. मात्र काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर घसरण होईल, असा अंदाज या पोलमधून वर्तवण्यात आला आहे. या पोलमधील आकडेवारीनुसार काँग्रेसला केवळ 16 ते 26 जागा मिळतील , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस तुलनेने चांगली कामगिरी करणार असून, राष्ट्रवादीला 33 ते 43 जागा मिळतील, असे हा एक्झिट पोल म्हणतो. इतर पक्षांचा विचार केल्यास अन्य एक्झिट पोलप्रमाणेच या एक्झिट पोलमध्येही मनसेला फार यश मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसेला 0 ते 1 जागा मिळेल. तर वंचित बहुजन आघाडी 2 ते 5 जागा जिंकण्यात यशस्वी ठरेल. तर इतर 5 ते 13 जागी विजय ठरतील.दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सोमवारी मतदान पार पडलं. यानंतर एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीची सत्ता कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी 3 पर्यंतचं मतदान गृहित धरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही महायुतीच विजयी होईल, अशी सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. या सर्वेक्षणानुसार महायुतीला 192 ते 216 जागा मिळू शकतात. सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुढील पाच वर्षेदेखील विरोधी बाकांवरच बसावं लागण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला 55 ते 81 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीत राज्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी 122 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना 63 जागा जिंकून दुसऱ्या स्थानी राहिली होती. त्यावेळी काँग्रेसला 42, राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर काही दिवसांत शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती.
Maharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 6:55 PM