मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज मतदान पार पडलं. यानंतर आता मतदारराजा राज्याचा कारभार कोणाकडे देणार, राज्याचे कारभारी बदलणार की तेच राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज ग्रामीण भागानं भरभरुन मतदान केलं, तर शहरी भागांमधील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीची सत्ता कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी 3 पर्यंतचं मतदान गृहित धरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही महायुतीच विजयी होईल, अशी सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. या सर्वेक्षणानुसार महायुतीला 192 ते 216 जागा मिळू शकतात. सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुढील पाच वर्षेदेखील विरोधी बाकांवरच बसावं लागण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला 55 ते 81 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीत राज्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी 122 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना 63 जागा जिंकून दुसऱ्या स्थानी राहिली होती. त्यावेळी काँग्रेसला 42, राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर काही दिवसांत शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. विभागनिहाय अंदाज-
मुंबई (एकूण जागा 36)महायुती- 29 ते 33महाआघाडी- 0 ते 6इतर- 1 ते 2
ठाणे कोकण (एकूण जागा- 39)महायुती- 30 ते 34महाआघाडी- 3 ते 7इतर- 1 ते 3
मराठवाडा (एकूण जागा- 46)महायुती 25 ते 29महाआघाडी- 12 ते 16इतर- 0 ते 7
उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा- 35)महायुती- 21 ते 25महाआघाडी- 11 ते 15इतर- 0 ते 1
विदर्भ (एकूण जागा- 62)महायुती- 47 ते 51महाआघाडी- 6 ते 10इतर- 2 ते 4
पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा- 70)महायुती- 40 ते 44महाआघाडी- 23 ते 27इतर- 0 ते 3