मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं, राज्यभरात ६०. ४८ टक्के मतदान झालं आहे. त्यापूर्वी विविध चॅनेल्सने घेतलेल्या एक्झिट पोलमधून राज्यभरात महायुतीला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. तर महाआघाडीलाही जेमतेम ६० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र या सर्व एक्झिट पोलमध्ये मनसेला कुठेही जागा मिळताना पाहायला मिळत नाही त्यामुळे राज ठाकरेंसाठी पुन्हा विधानसभा निवडणुकांचे निकाल अनाकलनीय निकाल लागणार? असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजकीय इतिहासात पहिल्यांदा एका सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला साथ द्या असं आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं. राज्यभरात मनसेने १०१ उमेदवार उभे केले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद याठिकाणी राज ठाकरेंच्या सभा झाल्या, राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत होती. मात्र यंदाही या गर्दीचं मतात रुपांतर होताना दिसत नसल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर येत आहे.
या पोलनुसार मनसेने माहिम, कल्याण ग्रामीण, कोथरुड या तीन ठिकाणी अटीतटीची लढत दिली आहे. मात्र येथेही जागा सत्ताधारी पक्षाच्या हातात जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या जागांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षा धरली आहे त्याठिकाणीही मनसेचा पराभव होईल असं सांगण्यात येत आहे. एकंदर पाहता राज्यातील यंदाची निवडणूक मनसेसाठी अस्तित्वाची निवडणूक होती. मात्र पोलनुसार मनसेला मिळालेलं अपयश पुन्हा दिसून आलं आहे. मात्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल.
मनसेने २००६ साली पक्षाची स्थापना केल्यानंतर अवघ्या ३ वर्षात राज्यात मनसेने १३ आमदार निवडून आणले होते. तर २०१४ च्या मोदीलाटेत मनसेला १ आमदार जिंकता आला होता. मनसेच्या एकमेव आमदारानेही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे मनसेच्या हाती काहीच शिल्लक नव्हतं. अशातच २०१९ ची लोकसभा निवडणूक मनसेने लढविली नव्हती. मात्र राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडीओमुळे राज्यभरात सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पण लोकसभा निवडणुकीतही मनसेच्या सभांचा फायदा झाला नसल्याचं दिसून आलं. या निवडणुकांच्या निकालावर राज ठाकरेंनी अनाकलनीय या एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरही मनसेची प्रतिक्रिया अनाकलनीय असेल का? की निकालांमध्ये चित्र बदलेलं असेल हे २४ तारखेला स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर
...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार
'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'
विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे